वार्ताहर/पुलाची शिरोली
महावितरण कार्यालयाकडून पाठविलेल्या वाढीव वीज बिलांची भारतीय कम्युनिस्ट पक्ष हातकणंगले शाखेच्यावतीने पुलाची शिरोली येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर कॉम्रेड गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलांची होळी करण्यात आली. ग्राहकांच्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय वीज बिल भरणार नाही त्यामुळे जर वीज कनेक्शन बंद केले तर महावितरणच्या कार्यालयात टाळे ठोकण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
महावितरण’कडून तीन महिन्यांचे एकत्रित बिल भरमसाठ वाढून आलेले आहे. सरासरीपेक्षा दुप्पट बिल आकारणी झाल्यामुळे ग्राहकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष हातकलंगले शाखेच्यावतीने शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर वाढीव बिलांची होळी करून महावितरणचा निषेध केला.
कोरोना महामारी मुळे मीटर वाचन बंद होते. वीज वितरण केंद्र बंद होते अशावेळी सरासरी रेडींग येणे आवश्यक होते. तीन महिन्यांचे बिल पाच हजारापेक्षा जास्त असल्यामुळे ग्राहकांना ते एकाच वेळी भरणे अशक्य आहेत त्यामुळे ५० टक्के सवलत द्यावी अशी मागणी आहे.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सह सेक्रेटरी कॉम्रेड गिरीश फोंडे म्हणाले, केरळ सरकारने पन्नास टक्के वीज बिलातील ५० टक्के रक्कम माफ केली आहे. या धरतीवर सरकारने ५० टक्के सवलत द्यावी. जावेद तांबोळी म्हणाले, केंद्र सरकारने जाहीर केलेले वीस लाख कोटी चे पॅकेज गेले कुठे? जनतेच्या समस्या वाढल्या असताना, पेट्रोल डिझेल दरवाढ केंद्र सरकारने केलेली आहेत त्यात वीज बिल वाढल्यामुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. प्रशांत आंबी म्हणाले, महावितरण प्रत्यक्षात रीडिंग न घेता अंदाजे रीडिंग दाखवून अवास्तव पैशाची आकारणी करून वाढीव वीज बिल सर्वसामान्य लोकांना देण्यात आलेल्या आहेत. कोरोना च्या पार्श्वभूमीवर महावितरण झालेला तोटा सर्वसामान्य कडून वसूल करणे हे चुकीचे आहे.
या आंदोलनात सुनंदा शिंदे, रेणुका चव्हाण, राजेंद्र पाटील, हर्षवर्धन कांबळे, राजू देसाई, अरुण शेंडगे, मासाई पखाले, जमीर गडकरी, बायाक्का पाटील यासह इतर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.








