पाचगाव / वार्ताहर
जगताप नगर, पाचगाव येथे गणेश जयंती साजरी करण्यावरून व अध्यक्षपदावरून ओंकार ग्रुप मित्र मंडळ या एकाच मंडळातील दोन गटात सोमवारी संध्याकाळी मारामारी झाली . यात एकजण गंभीर जखमी झाला. करवीर पोलीस घटनास्थळी दाखल होताच सर्वांची पांगापांग झाली.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, जगताप नगर येथील ओंकार ग्रुप मित्र मंडळामध्ये दोन ग्रुप पडले. यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन असले की मंडळांमध्ये धुसफूस सुरू असते. त्यांच्यात अनेक दिवसांपासून अंतर्गत वाद चालूच होता. सोमवारी गणेश जयंतीनिमित्त मंडळातील जुना वाद पुन्हा उफाळून आला. यामुळे दोन गटात दगडफेक व काठीने एकमेकांना मारहाण करण्यात आली, यात पाचगाव मधील एकजण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.
ओंकार ग्रुप मित्र मंडळामध्ये फूटबॉल क्लब पण आहे. राजकारणावरून अनेक वेळा मंडळात शाब्दिक चकमकी झाल्या .
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण अंतर्गत राजकारण करत होते. याचेच रूपांतर आज गणेश जयंती निमित्त भांडणात झाले. काही विशिष्ट राजकारण्यांमुळे मंडळातील तरुण मुलांच्या आयुष्याला वेगळे वळण लागण्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.
Previous Articleमातीचे ढिगारे हटविण्याची मागणी
Next Article गोकर्ण येथे महाशिवरात्रीनिमित्त पूर्वतयारी बैठक









