पाचगाव / वार्ताहर
पाचगाव, आर. के. नगर परिसरात रविवार दिनांक 16 ऑगस्ट पर्यंत एकूण 96 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पाचगाव, आर. के. नगर परिसरातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे ग्रामस्थांनी काळजी घेण्याची गरज आहे.
पाचगावमध्ये 15 जुलै रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर 16 ऑगस्ट पर्यंत म्हणजे साधारण एक महिन्यात 95 कोरोनाबाधित रुग्ण पाचगाव परिसरात आढळले आहेत. यापैकी 46 रुग्ण बरे झाले आहेत तर उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर पाचगावमधील एका वृद्धाचा कोरोना व निमोनियामुळे मृत्यू झाला आहे.
पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच, ग्रामसेवक लंबे, ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक व्ही. आय. कुंभार आरोग्य सेविका सी जे चोपडे या सर्वांच्या मार्फत पाचगावमधील मधील रुग्ण संख्या आटोक्यात यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नियमित जंतुनाशकांची फवारणी सुरू आहे. पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.