कोल्हापूर / संजीव खाडे
कृतिशिल सामाजिक कार्य आणि प्रबोधनपर गणेशोत्सवाची परंपरा जपणारे मंडळ म्हणून ऐतिहासिक खासबाग मैदानाजवळील प्रिन्स क्लबची ओळख. कोल्हापूरच्या गणेशोत्सवात दरवर्षी प्रिन्स क्लबच्या कल्पक देखाव्यावर गणेशभक्तांची नजर असते. गेली 44 वर्षे प्रबोधनाचा यज्ञ करणाऱया या क्लबने यंदाच्या गणेशोत्सवात कोरोना रूग्णांना मदत करण्यावर भर दिला. परराज्यातून आलेल्या कामगारांना वैद्यकीय मदत असो वा स्थानिक नागरिकांना वैद्यकीय उपचार असोत, जेथे आवश्यकता आहे, तेथे प्रिन्स क्लबच्या कार्यकर्त्यांनी सेवा देत गोरगरीब, सर्वसामान्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.
माजी महापौर (कै.) बळीराम पोवार यांच्या प्रेरणेतून 1977 मध्ये मंगळवार पेठ पोस्ट गल्लीत धामोडे चुना घाणीवाले यांच्या घरासमोर प्रिन्स क्लबची स्थापना झाली. तेंव्हापासून संस्थापक, मार्गदर्शक अशोक पोवार यांच्या नेतृत्वाखाली प्रिन्स क्लबची वाटचाल सुरू आहे. प्रबोधनात्मक, तांत्रिक देखावे सादर करण्याची आपली वेगळी शैली प्रिन्स क्लबने जपली. त्यातून दरवर्षी गणेशोत्सवात गणेशभक्तांची गर्दी खेचणारे मंडळ म्हणून ओळख निर्माण केली. व्यसनामुळे व्यसन करणाऱया व्यक्तीबरोबर त्याच्या कुटुंबाची कशी दुर्दशा होते, यावर भाष्य करणारा प्रबोधनात्मक प्रिन्स क्लबचा देखावा युवकांत जागृती निर्माण करणारा ठरला होता. पृथ्वीवर वाढणारे प्रदूषण आणि त्याच्या दुष्पपरिणामाची गंभीरता सांगणारा ‘वसंधुरेची हाक’ हा तांत्रिक देखावा सादर करून समस्त मानवापुढील धोका मांडला होता.
अंबाबाई मंदिरासंदर्भात वाद निर्माण झाल्यानंतर ‘अंबाबाई रूसली कोल्हापूर सोडून निघाली’ हा दोन तीन वर्षांपूर्वीचा तांत्रिक देखावा कोल्हापूरकरांना अंतर्मुख करणारा ठरला होता. मोठय़ा उंचीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी होणाऱया हेडसांडीवर नाराज झालेल्या ‘चालता बोलता गणराजा’वरील तांत्रिक देखावाही या क्लबने साकारला होता. रंकाळा तलावातील प्रदूषणाची गंभीरता मांडणाऱया ‘प्रदूषणच्या राक्षसाचा वध’ हा देखावा कोल्हापूरकरांच्या डोळय़ात झणझणीत अंजन घालणारा ठरला होता. दरवर्षी प्रबोधनावर भर देणाऱया या क्लबने दोन चार वर्षांपूर्वी गणेत्सवाच्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी म्हणून महिला, युवतींना संधी देताना महिला सशक्तीकरणाचा संदेशही दिला होता. 1980 असून ‘जाऊळाचा बाळ गणपती’ या रूपातील गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करण्याची परंपरा प्रिन्स क्लबने जपली आहे. त्यात आजवर कधीही बदल केलेला नाही.
कोविडच्या काळात वैद्यकीय मदतकार्य
यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत असताना कोविडच्या रूग्णांना मदत करण्याचे सामाजिक भान प्रिन्स क्लबने जपले. मार्गदर्शन अशोक पोवार सांगतात, कोरोनाच्या संसर्गामुळे सद्यःस्थितीत अनेकजण भीतीच्या छायेत आहेत. त्यांना मानसिक आधार देण्याचे काम कार्यकर्ते करत आहेत. प्रारंभी प्रतिकारशक्ती वाढविणाऱया औषधाचे वाटप केले. शिरोली नाक्याजवळ जी झोपडपट्टी आहेत. तेथे काही गुजरात, राजस्थान, कर्नाटक येथील कामगार राहतात. लॉकडाऊनमध्ये ते अडकून पडले होते. त्यांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी सहाय्य केले. जे अजूनही तेथेच राहतात. त्यांना कोरोनापासून बचावसाठी औषधांचे वाटप केले. काही जणांना वैद्यकीय तपासणीची गरज होती. त्यांना रूग्णालयात नेण्यात आले. झोपडपट्टीत राहणारे कामगार बहुतांश अल्पशिक्षित किंवा अशिक्षित आहेत.
त्यामुळे त्यांच्यात जागृती निर्माण करणे, कोरोनाची गंभीरता सांगण्याचे प्रयत्न केले. आमच्या गल्लीच्या परिसरात ज्या घरात ज्येष्ठ, जबाबदार व्यक्ती नाहीत. वयस्कर, वृद्ध व्यक्ती आहेत, अशा घरातील रूग्णांना उपचारासाठी, तपासणीसाठी नेण्याचे कामही कार्यकर्ते सद्या करत आहेत. काही जण भीतीमुळे आपल्या होणारा त्रास इतरांना सांगणे टाळतात. त्यांच्या पैकी काहींना उपचारासाठी दाखल केले आहे. सर्व दक्षता घेऊन कार्य सुरू आहे. मंडळाचे अध्यक्ष सुभाष पोवार, उपाध्यक्ष स. न. जोशी, सचिव नामदेव माळी, खजानिस प्रदीप काटकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते गणेशोत्सव आणि कोविड विरोधातील लढय़ात आपल्या परीने योगदान देत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









