तात्पुरती डागडुजी करुन दुचाकी वाहतुकीस रस्ता होईल खुला; नागरिकांना दिलासा
प्रतिनिधी / पन्हाळा
मुसळधार पावसाने पन्हाळ्याचा एकमेव मुख्य मार्गवरील चार दरवाजा येथील रस्ता खचला. त्यामुळे हा रस्ता वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. आज मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुंबई विभागाचे मुख्य अभियंता के. पी. पाटील यांनी या खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. येत्या पंधरा दिवसात या मुख्य रस्त्याची तात्पुरती डागडुजी करुन हा रस्ता दुचाकी वाहनांसाठी सुरु करण्यात येईल,तसेच रस्त्याचे दुरुस्तीचे काम देखील पावसाची परिस्थिती पाहुन युद्ध पातळीवर सुरु होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम पन्हाळा विभागाचे उपभियंता अमित कोळी यांनी दिली.
पावसामुळे पश्चिम महाष्ट्रात अनेक ठिकाणी रस्ते खचण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या खचलेल्या रस्त्यांची पाहणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी मुंबई विभागाचे मुख्य अभियंता के. पी. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार पन्हाळ्याच्या खचलेल्या रस्त्याची पाहणी पाटील यांनी केली. यावेळी कोल्हापुर जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय काटकर,उपभियंता व्ही.के.आयरेकर, नगपरिषदेचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे, रविंद्र धडेल उपस्थित होते.
दरम्यान यानंतर रेडेघाट, लंता मंगेशकर बंगला मार्गे तात्पुरत्या स्वरुपात बुधवारपेठ पर्यंत पर्यायी रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले. वनविभागाने परवानगी दिल्यास या पर्यायी रस्त्याचे देखील काम लवकरच सुरु होईल. तसेच पन्हाळा-बुधवार पेठ उड्डाणपुलाचे सर्वेक्षण होवुन त्याचा अहवाल पुणे विभागाकडे पाठविण्यात आला आहे. पुणे विभागाचे मुख्य अभियंता यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उड्डाणपुलाचे देखील काम सुरु होणार असल्याचे उपभियंता कोळी यांनी सांगितले.
वनविभागामुळे अडचण
लता मंगेशकर बंगला, रेडेघाट मार्गे बुधवारपेठ पर्यंत हलक्या चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पर्यायी रस्ता सुचविण्यात आला आहे. याची सर्वविभागाच्या वतीने पाहणी झाली. पण हा रस्ता वनविभागाच्या हद्दीतुन जात असल्याने त्यांच्या नियमांमुळे अडचण निर्माण झाली आहे. पण तात्पुरत्या स्वरुपात हा रस्ता चालु करण्यासाठी वनविभागाने सहकार्य करणेदेखील गरजेचे बनले आहे. तरी यासाठी नगरपरिषदेचे पदाधिकारी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे समजत आहे.









