वार्ताहर / उत्रे
पन्हाळा तालुक्यातील उत्रे, वाघवे यवळूज,पडळ,सातार्डे, खोतवाडी, माळवाडी, देवठाणे, कसबा ठाणे आदी गावात ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढला असून याचा प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. लोकरी माव्याच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादन घटण्याची भीतीमुळे शेतकरी हवादील झाला आहे.
कासारी नदीला बारमाही व मुबलक पाणी उपलब्ध असल्याने या परिसरातील शेतकरी ऊस हेच प्रमुख पीक घेतात. सद्या उन्ह-पाऊस, दमट व ढगाळ वातावरणामुळे लोकरी माव्याचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. आडसाली ८६०३२ व ९००५ या जातीच्या उसामध्ये शर्करेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लोकरी मावा दिवसेंदिवस वाढतच आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करत आहे. तात्पुरता लोकरी मावा कमी होतो. पण पुन्हा काही दिवसांनी लोकरी मावा डोकं वर काढतो. लोकरी माव्याचा जून ते ऑगस्ट महिन्यात केलेल्या आडसाली ८६०३२ व ९२००५ या जातीच्या ऊसावर जलद गतीने प्रसार होतो आहे. उन्हाळ्यात हुमणीमुळे ऊसाचे नुकसान झाले आणि आता लोकरी माव्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान होत आहे.
“रासायनिक खतांच्या भरसाठ किंमती व गतवर्षीचा महापूर यामुळे शेतकरी अगोदरच हबकला आहे.आता लोकरी माव्याचे संकट शेतकऱ्यांपुढे ‘आ’ वासून उभे आहे.तालुका कृषी विभागाने या किडीचा प्रसार कायमस्वरूपी रोखण्यासाठी मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी यांनी केले आहे.