प्रतिनिधी / हुपरी
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली शहरात कोरोनाने धुमाकूळ घालून शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. शहरात दिवसेंदिवस रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने शहरातील सामाजिक संघटना, संस्था, ग्रुप, मंडळे, व्यापारी व सुज्ञ नागरीक यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ची मागणी ग्रामपंचायतीकडे केली होती. या मागणीनुसार सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी ताबडतोब मिटिंग घेऊन मंगळवार 8 ते 12 सप्टेंबरपर्यंत पाच दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ लागू करणार असल्याची माहिती दिली.
मिटिंगमध्ये काही नागरिकांनी गेल्या सहा महिन्यापासून प्रत्येक धंद्यातील व्यापारी मेटाकुटीस आला असून छोट्या- छोट्या व्यावसायिकांच्या रोजी रोटीच्या दृष्टीने हा ‘जनता कर्फ्यू’ योग्य नाही. प्रशासनाने व्यवसायाची वेळ कमी करावी मात्र पूर्णतः बंदचा निर्णय घेवू नये असे म्हणणे मांडले तर काहींनी जनतेसाठी अत्यावश्यक असलेल्या बँका, पतसंस्था कार्यालये पाच दिवस बंद ठेवणे योग्य नसल्याचे मत व्यक्त होत आहे.
याबाबत बोलताना उपसरपंच कृष्णात मसुरकर म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाप्रमाणे व शासनाच्या नियमांचे उल्लंघन न करता सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाचा संसर्ग प्रादुर्भाव रोखणेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाचे वतीने कडक नियमांचे फलक लावणे, चौका चौकात गाडी लावून नियमावली सांगण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीररित्या दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत.
पट्टणकोडोली शहरामधील सर्व प्रभागामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊन समुह संसर्गामध्ये वाढ होत असलेचे दिसून येत असलेमुळे शहरामधील सामाजीक संघटना, संस्था, मंडळे, व्यापारी व नागरिक यांनी कोरोना संसर्गामध्ये वाढ होत असलेली साखळी तोडणेसाठी शहरामध्ये ‘जनता कर्फ्यू’ लागू करुन संपूर्ण व्यवहार बंद ठेवणे गरजेचे असल्याबाबतच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यास अनुसरुन शहरामधील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
दूध डेअरी, मेडिकल, शेती विषयक भाडांर केंद्र तसेच सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकीत्सालय आदी वगळून मंगळवार 8 ते शनिवार 12 अखेर पाच दिवस ‘जनता कर्फ्यू’ लागू करणेत आला आहे. या कालावधी मध्ये शंभर टक्के संपूर्ण व्यवहार बंद ठेवणेत येत आहेत. पेट्रोल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहना करीता चालू राहील. कोणीही अत्यावश्यक कामा शिवाय घराबाहेर पडू नये अन्यथा संबंधीतावर वरील कलमान्वये कडक कारवाई करणेत येईल असा इशारा उपसरपंच यांनी दिला.
नागरिकांनी आपली काळजी घेणेचे दृष्टीने मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे, साठ वर्षा वरील व्यक्तीने घराबाहेर पडू नये, लहान मुलांना रस्त्यावर सोडू नये तसेच कोणाच्याही संपर्कात येवू नये. घरी सुरक्षित राहण्याचे आवाहन सरपंच विजया अरुण जाधव, उपसरपंच कृष्णात मसुरकर यांनी केले.
यावेळी धुळा डावरे, अंबर बनगे, खानदेव पिराई, परशराम डावरे,रवी आडके, लक्ष्मण पुजारी, संतोष शेळके, आण्णा जाधव, सरदार सूर्यवंशी, सतीश मोरे, अनिल कांबळे (आर. पी. आय), डॉ. रजपूत, डॉ. हुपरे, अभिजित पाटील, कल्लाप्पा शिरोळे, रामा कुशाप्पा यांच्यासह सर्व पक्षातील नेतेमंडळी, डॉक्टर्स, अनेक संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी नागरिक उपस्थित होते.