सप्टेंबरपर्यंत होणार तालुकानिहाय आढावा बैठकी
प्रतिनिधी / चंदूर
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज हातकणंगले तालुक्यातील रुई गावातील पुलास भेट दिली. यावेळी मौजे रुई गावात 2019 व 2021 साली आलेल्या महापूरास रुई पुलाच्या बंधाऱ्यावरील भराव कारणीभूत असल्याची तक्रार रुई बंधारा विरोधी कृती समिती, इंगळी, वसगडे,रुकडी, माणगाव, पट्टणकोडोली आदी गावच्या नागरिकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या समोर मांडले.

या पुलाच्या भरावामुळेच आजूबाजूची सात ते आठ गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे म्हणणे मांडण्यात आले. यावर पालकमंत्री यांनी लवकरच तोडगा काढला जाईल. सप्टेंबर पर्यंत हातकलंगले आणि शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी पात्रात येणाऱ्या सर्व पुलांच्या भरावा बाबत आढावा घेणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विविध गावातील लोकप्रतिनिधिनी गावचे पुनर्वसन, 2019 प्रमाणे नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी मा. खासदार निवेदिता माने,आमदार राजूबाबा आवळे,मा.आमदार राजीव आवळे, डॉ. सुजित मिनचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, अभय काश्मीरे, राजू बेनाडे, सुभाष चौगुले,रुई सरपंच सौ.मुजावर,ता.प.स.महेश पाटील, चंदूर सरपंच अनिता माने, उपसरपंच भाऊसाहेब रेंदाळे, रुई पोलीस पाटील नितीश तराळ आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









