राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची सुचना : सीपीआरमधील बैठक,
कोरोना काळात दिलेल्या योगदानासाठी डॉक्टर, स्टाफचा गौरव, ‘सीपीआर’चा गैरवापर करणाऱ्यांनी काढता पाय घ्यावा : क्षीरसागर यांचा इशारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनामुक्तांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायी बाब आहे. कोरोना काळात सीपीआरमधील डॉक्टर, स्टाफने दिलेले योगदान स्पृहणीय आहे. कोरोना कमी होत असताना नॉन कोरोना रूग्णांसाठी यंत्रणा उभी करा, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. सीपीआरचा गैरवापर करणाऱयांनी सीपीआरमधून काढता पाय घ्यावा, असा इशाराही त्यांनी दिला.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये सोमवारी माजी आमदार क्षीरसागर यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदकांत मस्के, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत कोरोनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील नॉन कोरोना रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करा, या मागणीचे निवेदन अधिष्ठाता डॉ. मस्के यांना दिले.
माजी आमदार क्षीरसागर म्हणाले, जिल्ह्यात प्रशासनाचे प्रयत्न आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोनासाठी शासकीय, खासगी हॉस्पिटल्स आरक्षित केली होती, त्यामुळे अन्य रूग्णांची कोंडी होत होती. अन्य रूग्णांना खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेणे आर्थिकदृष्टया अवघड होत आहे. सीपीआरचा भार सेवा रूग्णालयावर पडला आहे. पण तेथे बेड, स्टाफ कमी आहे. सीपीआरमधील अपघात विभाग, प्रसुती, हृदय, मेडिसीन, बालरोग विभागही बंद आहे. त्यामुळे येथील स्टाफ सेवा रूग्णालयाला पाठवावा. खुपिरे ग्रामीण रूग्णालय, गांधीनगर सेवा रूग्णालयात तसेच शेजारील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा वापर नॉन कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी करावा, अशी मागणी केली. शहरातील सावित्रीबाई फुले, पंचगंगा हॉस्पिटलचा पूर्ण क्षमतेने वापर करावा आणि सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोना केंद्र सुरू करावे, तेथे बाह्यरूग्णांची तपासणी करावी, अशी सुचना त्यांनी केली.
आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, शहरातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. पण तरीही नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करावा, शहरात नव्याने कोरोना केअर सेंटर थांबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे गौरवास्पद योगदान
माजी आमदार क्षीरसागर यांनी सीपीआरमधील वैद्यकीय स्टाफच कौतुक केले. तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका, आरोग्य विभागांनी चांगले योगदान दिल्याचे सांगितले. कोरोना काळात काहींनी रूग्णांना लुटण्याचे काम केले आहे, अशांविरोधात शिवसेना आवाज उठवत राहील. तसेच सीपीआरचा गैरवापर करणाऱयांनी `सीपीआर’मधून काढता पाय घ्यावा, त्यासाठीही प्रसंगी पावले उचलू, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला नगरसेवक नियाज खान, दीपक गैड, सुनील करंबे, किशोर घाटगे, गायकवाड, डॉ. पोळ, डॉ. बनसोडे, डॉ. मिसाळ, डॉ. गिरीश कांबळे, डॉ. आरती घोरपडे, डॉ. सैबन्नावर, डॉ. बडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.