माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची टीका : कोरोनाच्या संकटात योग्य उपाययोजना करण्याकडे दुर्लक्षाचा आरोप
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱया मृत्युचा दर वाढण्यामागे तिन्ही मंत्र्यांची निष्क्रियता कारणीभूत असल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. कोरोना वाढत असताना रोखण्यासाठी आवश्यक त्या वैद्यकीय उपाययोजना करण्याकडे या तिन्ही मंत्र्यांनी दुर्लक्ष केले. आता गोकुळची निवडणूक झाल्यानंतर तरी कोरोना रोखण्याचे काम करा, असा टोलाही खोत यांनी लगावला.
खोत यांनी पत्रकार परिषदेत कोल्हापूरच्या वाढत्या कोरोना मृत्युदराविषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कोल्हापूरमध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या रूपाने तीन बडे मंत्री आहेत. कोरोनाचे संकट वाढ असताना अत्यावश्यक उपाययोजना, सुविधा वाढविण्याची गरज होती. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. तिन्ही मंत्र्यांना प्रत्येकी एक हजार बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करता आले असते. त्याचबरोबर शासकीय हॉस्पिटलबरोबरच तालुकास्तरावरील उपजिल्हा रूग्णालयात कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करून बेड वाढविणे आवश्यक होते. या गोष्टी प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोनाच्या रूग्णांना मोफत उपचार देण्याचा शासकीय जीआर आणि न्यायालयाचा आदेश असताना त्याची अंमलबजावणी शासकीय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये होते की नाही, याबद्दल माहिती घेण्यासाठी पथके निर्माण केली गेली नाही. किमान यापुढे तरी पथके नेमून कोरोनाच्या रूग्णांना आरोग्य योजनेचा लाभ द्या, असे आवाहनही खोत यांनी केले.