घरीच नमाज अदा करण्याचे प्रशासनाचे आवाहन, भरपावसात मुस्लिम बांधवांनी केली खरेदी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना संसर्गामुळे बकरी ईदवर गतवर्षीप्रमाणेच निर्बंध कायम आहेत. त्यामुळे बुधवार, 21 रोजी होणारी बकरी ईद कोरोना निर्बंधातच साजरी होणार आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता आपल्या घरीच अदा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुस्लिम बोर्डींगच्या पटांगणावर बकरी ईदची नमाज अदा करण्याची परंपरा आहे. परंपरा कायम ठेवण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या आधीन राहून केवळ पाच मुस्लिम बांधव नमाज पठण करतील. सकाळी 9.30 वाजता हा नमाजचा कार्यक्रम होईल, असे मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
भर पावसातही मुस्लिम बांधवांकडून खरेदी…
तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बंद असलेली दुकाने सोमवारी उघडली आहेत. त्यामुळे बकरी ईदसाठी मनसोक्त खरेदी करण्याची संधी मिळाल्याने मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कोरोनामुळे रमजान ईदसाठी सलग दोन वर्षे मुस्लिम बांधवांना कोणत्याही वस्तूची खरेदी करता आली नव्हती. मात्र बकरी ईदच्या तोंडावर शहरातील दुकाने खुली झाल्याने मुस्लिम बांधवांनी घराबाहेर पडून मनसोक्त खरेदी केली. खरेदीवेळी पावसाचा व्यत्ययही आला. पण त्याची तमा न बाळगता मुस्लिम बांधवांनी महापालिका, माळकर तिकटी, खाटीक चौक, लक्ष्मी रोड, राजारामपुरीसह शहरातील ठिकठिकाणच्या दुकानांमध्ये खरेदी केली.









