प्रतिनिधी / हलकर्णी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या गोटूर बंधाऱ्याजवळ डॉ. भिडे यांच्या शेता शेजारी हिरण्यकेशी नदीच्या काठावर बुधवारी सकाळी मगर दिसली आहे. मगर दिसल्यापासून नांगनूरसह संकेश्वर ग्रामस्थांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
नांगनूरचे शेतकरी रायगोंडा नार्वेकर हे सकाळी हिरण्यकेशी नदीच्या काठावर नांगनूर हद्दीत गवत कापण्यासाठी गेले होते. गवत कापत असताना त्यांना नदीच्या पलिकडील बाजूस मगर दिसली. ती मगर सुमारे ८ फुट लांबीची होती. सुमारे अर्धातास मगर नदीच्या काठावर उन्हात पडून राहिली होती. त्यानंतर पुन्हा पाण्यात गेली. मगरीने गवतावर फिरल्याने त्याठिकाणीचे गवत जमिनीवर आडवे झाले होते. मगर दिसल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरातच कपडे धुण्यासाठी बंधाऱ्या शेजारी असणाऱ्या महिला, ग्रामस्थांनी नांगनूरकडील बाजूस गर्दी केली होती. सध्या तरी ग्रामस्थांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीसाठी तहसिलदार दिनेश पारगे यांनी दक्षतेचे आदेश दिली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या वनविभागाने संयुक्तपणे मगरीचा शोध घेवून बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.









