प्रतिनिधी/पेठ वडगाव
वडगाव एस.टी.बस स्थानक चौकात दोन तरुण मुलांच्या गटात टपरी लावण्याच्या कारणावरून मारामारी झाली. यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. यामुळे दंगल होईल अशी माहिती वडगाव पोलिसांना मिळाली. आणि पोलीस ठाण्याची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या ठिकाणी जखमी युवकाला उपचारास नेण्यासाठी आणि या ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेचे अग्निशामक दल दाखल झाले. काय झाले म्हणून नागरिकानीही बस स्थानकाकडे धाव घेतली. मात्र काही काळानंतर हे लक्षात आले की, ही पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी घेतलेली दंगल काबू करण्याची रंगीत तालीम होती. आणि वडगावकरांचा जीव भांड्यात पडला.
पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी आगामी नवरात्रोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर एस.टी.बस स्थानक परिसरात दंगल काबू रंगीत तालीम घेण्यात आली. ही रंगीत तालीम वडगाव एस.टी.बस स्थानक परिसरात घेण्यात आली. प्रथमतः पोलीस ठाण्याची गाडी, अग्निशामक गाडी, रुग्णवाहिका आणि पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली काय झाले, कोणाची भांडणे झाली याचे कुतूहल नागरिकांना लागून राहिले. एस.टी.बस स्थानकावर नागरिकांची गर्दी होवू लागली.
पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी दोन्ही गटातील युवकांना समजावून सांगून भांडण मिटवित होते. अखेर काही काळानंतर दंगल काबू रंगीत तालीम असल्याचे नागरिकांना पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी सांगितल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी नागरिकांना पोलीस निरीक्षक काळे यांनी पोलीस दल आपल्या सुरक्षेसाठी सदैव दक्ष असल्याचा विश्वास दिला.
या प्रात्यक्षिकावेळी तीन पोलीस अधिकारी, चौदा पोलीस कर्मचारी, एक होमगार्ड हजर होते. यावेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी मयूर धनवडे, केतन धनवडे, प्रशांत आवळे यांनी नगरपालिका अग्निशामक दलाचे प्रात्यक्षिक दाखविले, वडगाव प्रेस रिपोर्टर असोसिएशनची रुग्णवाहिका यांचे प्रात्यक्षिक झाले.









