कोरोनामुळे मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचे संकेतच नाहीत
अंबाबाई मंदिरही राहणार सुने-सुने
संग्राम काटकर / कोल्हापूर
गेल्या तीन महिन्यापुर्वीपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु असली तरीही कोरोनामुळे भाविकांसाठी बंद ठेवलेली मंदिरे निदान आजच्या घडीला तरी खुली करण्याच्या मनस्थितीत राज्य सरकार नाही. भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारण्यामागे कोरोनाचे वाढते संकट हे कारण सरकार सांगत आहे. भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याबाबत राज्यभरातील आंदोलनेही सरकारने झुगारली आहे. त्यामुळे मोठी परंपरा आणि धार्मिक अधिष्ठान लाभलेला नवरात्रोत्सव यंदा सर्वच मंदिरातच साजरा जाईल पण तो भाविकांविना असेल हे मात्र निश्चित. त्यामुळे दर्शनासाठी अंबाबाई मंदिरांसह सर्व मंदिरासमोर भाविकांच्या रांगांचा माहोलही असणार नाही. देवांची आराधनाची फक्त घरातच आणि मंदिरांना पालखी, ललितापंचमी, जागर, विजयादशमी ही धार्मिक कार्ये मानकरी आणि पुजारींसोबतच करावी लागणार आहेत.
मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्रात झाल्यानंतर सरकारने तातडीने मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे भक्तांसाठी बंद करुन संसर्ग रोखण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल टाकले. सरकारच्या या निर्णयाचे स्वागतही झाले. लॉकडाऊनमुळे जिह्याच्या सीमा सिल ठेवल्याने धार्मिकस्थळांकडे भक्त येणे बंद झाले. त्यामुळे धार्मिकस्थळे बंद राहिल्याने अवलंबित छोटे व्यावसायिक, पुजारी, गुरव, हारवाले, पूजा साहित्य-देवदेवतांच्या प्रतिमा-खेळणी विक्रेते, हॉटेल, दुकानदार आदींना गाशा गुंडाळून घरी बसावे लागले. 3 महिन्यांपूर्वी मात्र केंद्र सरकारने ऍनलॉकची प्रक्रीया सुरु करुन देवदेवतांची मंदिरे धार्मिकस्थळे भक्तांसाठी खुली करण्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार देशातील मोठी मंदिरे भाविकांसाठी खुली झाली असली तरी सरकारने महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांसाठी खुली केली नाहीत.
महसुलासाठी मद्याची दुकाने सुरु करता मात्र मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवता हा मुद्दा घेऊन गेल्या महिन्यात भाजपसह हिंदूत्ववादी संघटनांनी उघड उद्धवा भक्तीचं दार उघड, अशी घोषणा देत मंदिरे आंदोलन केले. मंदिरे भाविकांसाठी खुली करा अन्यथा आम्ही ती खुली करु असा इशारा दिला आहे. मनसेनेही मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, वाईन्स, आयात-निर्यात सुरु असताना मंदिरे मात्र का बंद, असा सवाल उपस्थित केला आहे.
अशा सगळ्या परिस्थितीच यंदाचा नवरात्रोत्सव केवळ 25 दिवसांवर आला आहे. सरकार मात्र कोरोनामुळे उत्सवासाठी मंदिरांमध्ये भाविकांसाठी प्रवेश देण्यास अजिबात तयार नाही. त्यामुळे करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजा भवानी मंदिर, वाडीरत्नागिरीवरील जोतिबासह तुळजापूरची तुळजा भवानी, माहुरची रेणूकादेवी, नाशिकची वणीसप्तश्रुंगी, येरमाळा येथील येडाईदेवी, मांडरगडची काळूबाई, खंडोबाची देवस्थान असलेली पाली, जेजुरी, नळदुर्ग, औंधची यमाई, कार्ला (लोणावळा) येथील एकवीरादेवी आदींसह राज्यातील सर्वच देवदेवतांच्या मंदिरांना उत्सव भाविकांविनाच साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे मंदिर व परिसरात लाखो भाविकांचा माहोल असणार नाही. मानकरी आणि निवडक यांनाच उत्सवातील सर्व धार्मिक विधी पूर्ण करावी लागणार आहे. पण हे विधी करण्यासाठी सरकार काय निर्देश देते याची मंदिरांना वाट पहावी लागेल.
आराधना घरातून करा
महाराष्ट्र कोरोना आल्यापासून नागरीकांनी काळजावर दगड ठेवून शिवजयंतीपासून गणेशोत्सवापर्यंतचे सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करुन सरकारला सहकार्य केले आहे. सणांवेळी गर्दी होणार नाही, याचीही काळजी सर्वांनी घेतली आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात दर्शनासाठी मंदिरात गर्दी झाली तर त्यातून कोरोनाचा होणारा संसर्ग रोखणे कठिण जाईल. तेव्हा सर्वांनी मन घट्ट करुन देवांची आराधना घरातून करावी, असे मला वाटते.