उचगांव /वार्ताहर
घरगुती किरकोळ कारणावरून मद्यधुंद अवस्थेतील मुलाने धारदार कात्रीने छातीवर वार करून बापाचा खून केला. उचगाव (ता. करवीर) येथील मणेरमळ्यातील इंद्रजीत कॉलनीत आज रविवारी दुपारी हा प्रकार झाला. चंद्रकांत भगवान सोनवले (वय 52, मूळ रा. भिलवडी, जि.सांगली, सध्या रा. उचगाव पैकी मणेरमळा- इंद्रजीत कॉलनी) असे मृताचे नाव आहे, तर आरोपी ज्ञानेश्वर चंद्रकांत सोनवले (वय २4) याला बापाच्या खुनाबद्दल पोलिसांनी अटक केली आहे.
चंद्रकांत सोनवले यांची पत्नी कमल कामावर व मुलगी प्राजक्ता दुकानाचे बिल भागवण्यासाठी गेल्या होत्या. मुलगा ज्ञानेश्वर व वडील चंद्रकांत सोनवले यांच्यात जेवणावरून वाद झाला. असली कसली भाजी बनवली आहे, असे चंद्रकांत सोनवले यांनी विचारत मुलगा ज्ञानेश्वरला तांब्या फेकून मारला. त्यामुळे दोघात वाद वाढत गेला. दोघेही दारू प्यालेले होते. वाद विकोपाला गेल्यानंतर मुलगा ज्ञानेश्वर याने चिडून जाऊन वडील चंद्रकांत यांच्या छातीवर धारदार कात्रीने वार केले. वार वर्मी लागल्याने जागीच चंद्रकांत यांचा मृत्यू झाला. गांधीनगर पोलिसांना माहिती मिळताच सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान ते घटनास्थळी पोचले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान घरीच थांबून राहिलेल्या संशयित आरोपी ज्ञानेश्वर सोनवले याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
मृत चंद्रकांत सोनवले यांची मुलगी प्राजक्ता चंद्रकांत सोनवले यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ज्ञानेश्वर सोनवले याला अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू राहिले. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ प्रशांत अमृतकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर तसेच आकाश पाटील,मोहन गवळी यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम करत आहेत.
चंद्रकांत सोनवले व ज्ञानेश्वर सोनवले याआधी पेंटर व गवंडी काम करीत होते. दोघेही सध्या रोजगार करत नव्हते. त्यामुळे चंद्रकांत सोनवले यांची पत्नी कमल व मुलगी प्राजक्ता घरचा उदरनिर्वाह करत होत्या, अशी घटनास्थळी चर्चा सुरू राहिली.
Previous Articleरत्नागिरी जिल्ह्यात आज ६८ रुग्ण पॉझिटिव्ह
Next Article कोल्हापूर : टेम्पोच्या धडकेत भिवशीचा इसम ठार









