स्वाभिमानीच्या दूध आंदोलनास संमिश्र प्रतिसाद
प्रतिनिधी / कोल्हापूर
गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान मिळावे, दूध पावडरच बफर स्टॉक करावा, दूध पावडरची आयत बंद करावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी राज्यव्यापी दूध बंद आंदोलन केले. या आंदेलनास संमिश्र प्रतिसाद मिळाला. सांगली जवळ टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून देण्यात आले. हातकणंगले जवळील तमदलगे बाय पास रस्ता, शिरोळ राधानगरी, गडहिंग्लज, शाहूवाडी येथे ठिकठिकाणी गोकुळच्या गाडय़ा अडवण्यात आल्या. आंदोलनादरम्यान गोकुळचे अडीच हजार लिटर दूध रस्त्यावर ओतण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूध दराच्या वाढीसाठी मंगळवारी 21 जुलै रोजी एक दिवसीय राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलनाची हाक दिली होती. राज्यात सध्या गायीच्या दुधाची खरेदी कमी दराने केली जात आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे, दूध पावडरची आयात बंद करावी आदी मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेने आंदोलन हाती घेतले होते.
सकाळी शेट्टी यांनी उदगाव येथील महादेव मंदिरात शिवलिंगास दुधाचा अभिषेक घालून आंदोलनास सुरवात केली. आंदोलनाला पहाटेपासूनच सुरुवात झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, बुलढाणा अशा विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी दुधाच्या टँकर अडवले, काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतण्यात आले. माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी त्यांच्या बुलढाणा येथील जनसंपर्क कार्यालयासमोर स्वताः दुधाने आंघोळ करीत आंदोलन सहभाग घेतला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बिद्री येथे आंदोलन केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघाचे टँकर रोखले. दुधाचे कॅन रस्त्यावर ओतले. दरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी वाहने अडवून गरीबांना दुधाचे मोफत वाटप केले. गावोगावी ग्रामदेवतेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. सांगली जिह्यात स्वाभिमानीचे पदाधिकारी महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली दूध संकलन बंद आंदोलन झाले.
गोकुळचे 39 हजार लिटर दूध झाले कमी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनामुळे जिल्हय़ात सर्वाधिक दूध संकलन करणाऱया गोकुळ दूध संघावर परिणाम झाला. सकाळच्या सत्रात गोकुळच्या सहा सेंटरवरुन नेहमीपेक्षा 39 हजार 261 लिटर दूध कमी संकलित झाले. गोकुळच्या मुख्य सेंटरशिवाय बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ येथे दूध संकलन होते. मुख्य सेंटरवर 17 हजार तर शिरोळच्या सेंटरवर 11 हजार लिटर दूध कमी संकलित झाले. म्हैस दूध 1 लाख 83 हजार तर गायीचे 1 लाख 84 हजार असे एकूण 3 लाख 67 हजार लिटर दूध सकाळच्या सत्रात संकलित झाले. संघटनेच्या आंदोलनामुळे अनेक शेतकर्यांनी दूध दिले नाही तर काही ठिकाणी वाहने पोहचण्यास अडथळा झाला होता. संध्याकाळच्या सत्रा दूध संकलन सुरळीत झाले.








