कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत कोरोनाने 5 बळी घेतले. दैनंदिन नव्या रूग्णसंख्येत दुप्पटीने वाढ झाली. कोरोनाची दुसरी लाट दाराशी येऊन ठेपलीय. प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. तरीही कोरोना काय करतोय, अशा आर्विभावात प्रत्येक जण वावरत आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष होतेय. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला बेपर्वाई कारणीभूत ठरत आहे. कोरोनाची भीतीच मोडल्याने सामुहिक संसर्गाचा धोकाही वाढला आहे.
गेल्या काही दिवसांत वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. धुके, थंडी, पाऊस, बोचरे वारे अन् ढगाळ वातावरण.. अशा दमट, कोरड्या हवामानात कोरोनाचा नवा विषाणू सक्रीय झाला आहे. तो स्टेन' असल्याची चर्चा आहे. दुषित वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीच्या रूग्णांत वाढ झाली आहे. छोट्या क्लिनिकमध्ये रूग्णांची गर्दी वाढली आहे. त्यातूनच संशयित कोरोना रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. दोन दिवसांत कोरोनाने 5 जणांचा बळी घेतला, नव्या रूग्णांत सातत्याने वाढ होत आहे. सक्रीय रूग्णसंख्या 15 दिवसांत 34 वरून 153 वर पोहोचली आहे. हे सारं चित्र कोरोनाच्या दुसऱया लाटेचे संकेत आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. काही जिल्ह्यातंत कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन सुरू झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात अद्यापी कम्युनिटी स्प्रेड नाही, पण धोका कायम आहे. त्यातूनच प्रशासनाने मास्क नसलेल्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यातूनच दोन दिवसांत दीड लाखांहून अधिक दंड जमा झाला आहे. रविवारी सुटी दिवशी शहर परिसरासह जिल्ह्यातील पर्यटन, धार्मिक स्थळी गर्दी झाली होती. शहरातील प्रमुख मार्गावर,बाजारपेठांत गर्दी होती, त्यात अनेक जण मास्कविना वावरत होते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.कोरोना आम्हाला काय करतोय,’ अशा आर्विभावात वावरणाऱ्यांची बेपर्वाई इतरांच्या आरोग्यासाठी धोक्याचा इशारा ठरली आहे.
जिल्ह्यात आजपर्यत कोरोना रूग्णसंख्या 50 हजार 154 झाली आहे. त्यापैकी 48 हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाने 1 हजार 736 जणांचा बळी गेला आहे. सध्या 152 सक्रीय रूग्ण आहेत. नववर्षात कमी झालेल्या कोरोनाने डोके वर काढल्याचे चित्र आहे. याचवेळी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. शनिवारी दिवसभरात 2700 लाभार्थींपैकी 1 हजार 289 जणांची लस घेतली. आजपर्यंत 45 हजार 400 पैकी 27 हजार 447 जणांनी लस घेतली आहे. यातील काही जणांनी दुसरा बुस्टर डोसही घेतला आहे.
कोरोना लसीकरणाला प्रतिसाद देण्यापेक्षा कोरोना संसर्ग वाढण्यास सर्वसामान्यांची बेपर्वाई कारणीभूत ठरली आहे. कोरोनाची दुसरी लाट दारात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास कोल्हापूरसाठी कोरोनाची दुसरी लाट धोक्याची ठरेल. त्यासाठी बेंपर्वाई टाळा अन् कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसुत्री अंमलात आणा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने केले जात आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांत कोरोनाचे 5 बळी,
शहरात दैनंदिन रूग्णसंख्येमध्ये दुप्पट वाढ,
लसीमुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग दुर्लक्षित,
दंडात्मक कारवाई सुरू, तरी बेफिकीरीत वाढ,
`कोरोना’ची भीतीच मोडल्याने संसर्ग वाढला









