प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेकच्या तिसऱया टप्प्यातील प्रायोगिक लससाठी बुधवारी 101 जणांनी नोंदणी केली. तसेच 30 जणांनाही लस टोचण्यात आली. आमदार चंद्रकांत जाधव यांनी या लसिकरण केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. लस घेतल्यानंतर अर्ध्या तास दक्षता घ्या. त्यानंतर कोणतेही पथ्यपाणी नाही, त्यामुळे नागरिकांनी लसिकरणाला निर्भयपणे प्रतिसाद द्यावा, असे आवाहन `क्रोम’चे प्रमुख डॉ. धनंजय लाड यांनी केले आहे.
येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि क्रोम कंपनीने मंगळवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेकच्या तिसऱया टप्प्यातील प्रायोगिक लसिकरणाला सुरूवात केले. बुधवारी पहिल्याच दिवशी 30 जणांना ही लस टोचण्यात आली. लसिकरणासाठी 101 जणांनी नोंदणी केल्याची माहिती समन्वयक परेश पाटील यांनी दिली.
दरम्यान, आमदार चंद्रकांत जाधव यांनी दुपारी सीपीआर हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलमध्ये तयार केलेल्या वॉकिंग कुलर रूमची पाहणी केली. त्यानंतर जुन्या इमारतीतील कोव्हॅक्सिन लसिकरण केंद्राला भेट दिली. तेथे त्यांनी लसिकरणाची माहिती घेत आढावा घेतला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. भुपेंद्र गायकवाड, डॉ. बडे, डॉ. गिरीष कांबळे, डॉ. सुनीता रामानंद, क्रोमचे डॉ. धनंजय लाड, तेजस्विनी पाटील, परेश पाटील आदी उपस्थित होते.
लस घेतल्यानंतर अर्धा तास दक्षता घ्या
कोरोना प्रतिबंधक असलेल्या चाचणी घेण्यात येत असलेल्या लसीसंदर्भात गैरसमज आहेत. यामध्ये पथ्यपाणी आहे. मांसाहार करता येत नाही, असा अपप्रचार केला जात आहे. पण कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अर्ध्या तासाने काहीही खाता येते. तीन महिने पथ्यपाणी असल्याचा गैरसमज आहे. त्यामुळे इच्छुक स्वयंसेवकांनी निर्भयपणे नोंदणी करावी, असे आवाहन `क्रोम’ कंपनीच्या डॉ. धनंजय लाड यांनी केले आहे.









