शुक्रवारी स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीची जयसिंगपुरात बैठक
विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
स्वाभिमानीची ऊस परिषद होणारच, असे राजू शेट्टी ठणकावून सांगत असले तरी तारखेबात अद्याप संभ्रम आहे. शुक्रवार, 16 रोजी स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. कोरोनाचे सावट असताना परिषद नेमकी कशी होणार, यावर बैठकीत चर्चा होईल. तथापि शिवसेनेचा मुंबईत होणारा दसरा मेळावा होणार का, यावरच ऊस परिषदेची रणनीती ठरु शकते.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मेळावे, सभांवर बंदी घालण्यात आली. असे असताना शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होतो, याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यामुळे हा विजयोत्सव दसरा मेळाव्यात साजरा होवू शकतो. लॉकडाऊन शिथिल करुन दसरा मेळावा घेण्यात यावा, अशी शिवसैनिकांची भावना आहे. हे सत्यात उतरले तर स्वाभिमानीच्या ऊस परिषेदपुढील मोठी अडचण दूर होणार आहे. त्यामुळे सेनेच्या दसरा मेळाव्यावर ऊस परिषद कशी होणार हे ठरणार आहे.
शेतकऱ्यांना अपेक्षा दराचीच
ऊस हंगामाच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद भरते. आतापर्यंत 18 ऊस परिषदा झाल्या. या परिषदेत उसाला किती दर मागितला जातो. याकडे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या नजरा असतात. विशेष म्हणजे देशभरातील ऊस पट्टयातील शेतकरी नेते पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती लावतात. गत वर्षीच्या प्रलयंकारी महापुरामुळे ऊसशेती उदवस्त झाली. यातून अजूनही शेतकरी सावरलेला नाही. त्यामुळे निदान यंदातरी भरभक्कम दर मिळेल, या अपेक्षेवर शेतकरी आहे. त्यामुळे यंदाची ऊस परिषद शेतकऱ्यांच्या दृर्ष्टीने महत्वाची होती. मात्र या ऊस परिषदेवर कोरोनाचे गडद सावट आहे. यंदा वाढेलेल्या ऊस क्षेत्रामुळे हंगाम लवकरल सुरु करण्याचे प्रयत्न आहेत. सरकारकडून 15 ऑक्टोबराल हंगाम सुरु होईल असे जाहीर केले आहे. कारखानादारांचीही हंगामाची तयारी सुरु आहे. सरकारकडून 15 ऑक्टोबर तारीख जाहीर झाली तरी पूर्ण क्षमेमतेने कारखाने सुरु होण्यासाठी नोव्हेंबरचा दुसाल पंधरवडा उजाडतो.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला महत्त्व
दरम्यानच्या काळात स्वाभिमानीची ऊस परिषद होवून तडजोडीने कारखाने सुरु केले जातात. मात्र यंदा ऊस परिषदच कोरोनाच्या सावटाखाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असाच सुरु राहिल्यास ऊस परिषद घ्यायची कशी आस प्रश्न स्वाभिमानीसमोर आहे. तरीही राजू शेट्टी ऊस परिषदेवर ठाम आहेत. गत वर्षी 23 नोंव्हेबरला ऊस परिषद झाली होती. ही वेळ पाहता प्रशासनाने परवनगी दिली तर या दरम्यान 19 वी ऊस परिषद होईल. मात्र याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुका प्रशासनाने हात वर केल्याचे समजते. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱयांच्या निर्णयाला महत्व आले आहे.
परवानगी नाकरली तर अन्य पर्याय
शासनाकडे रितसर परवानगी मागितली जाईल, कोरोनाचे निमित्त पुढे करुन नकार आल्यास अन्य मार्गाने ऊस परिषद घ्यावी का याबाबतचा निर्णय शुक्रवारच्या बैठकीत होणार आहे.
-प्रा. जालंदर पाटील, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी पक्ष









