म्हासुर्ली / वार्ताहर
म्हासुर्ली पैकी भित्तमवाडी (ता.राधानगरी) येथे अतिवृष्टीत दरड कोसळूच मृत झालेल्या बळवंत सुभाना भित्तम या शेतकऱ्याच्या वारसांना शासनाच्या आपत्ती विभागाकडून तातडीने चार लाख रुपयांची देण्यात आली.
५ ऑगस्टला धामणी खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीत भित्तमवाडी येथील तरुण गरीब शेतकरी बळवंत भित्तम यांच्या अंगावर शेतातील दरड कोसळली होती यातच त्यांचा जागी मृत्यू झाला होता. घरचा कर्ता पुरुषच अपघातात गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले होते.
महसुल विभागाचे तहसिलदार, सर्कल, तलाठी अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा पंचनामा करुन जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. तसेच संबंधित गरीब कुटुंबाला तत्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार प्रकाश आबिटकर, शिक्षक नेते युवराज पाटील, यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देऊन शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.
या सर्वांच्या प्रयत्नांना यश येत संबंधित कुटूंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांचा मदतीचा तत्काळ धनादेश देण्यात आला. नुकताच सर्कल देवीदास तारडे, तलाठी विजय पाटील यांनी सदर मृत शेतकऱ्याच्या घरी जाऊन शासकीय मदतीचा धनादेश कुटूंबाकडे सुर्पुद केला.









