कारखानदारांना सहकारमंत्र्यांचा दणका, आंदोलन अंकुश, जयशिवराय, बळीराजाच्या लढ्याला यश
प्रतिनिधी / कोल्हापूर
साखर कारखान्यांकडून थकीत एफआरपी वरील 15 टक्के दराने व्याज वसूल होणार आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारखानदारांच्या अपिलावरील स्थगीती उठवल्याने व्याज वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. एका कोल्हापूर विभागात 100 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात. आंदोलन अंकुश, जय शिवराय किसान संघटना, बळीराजा शेतकरी संघटेनांनी यासाठी कायदेशीर लढा दिला होता.
कोल्हापूर विभागातील 39 कारखान्यानी 2019 या वर्षात थकवलेल्या एफआरपीवरील 15 टक्के प्रमाणे व्याज अकारणी करुन शेतकऱ्यांना पैसे द्यावेत अशी मागणी आंदोलन अकुंशचे धनाची चडमुंगे, जय शिवराय किसान संघटनेचे शिवाजीराव माने, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. काका पाटील यांनी आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. यावर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्याज वसूल करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वसुलीची कार्यवाही सुरु झाली होती. मात्र तात्कालीन सहकामंत्री यांच्याकडे कारखानदारांनी अपिल करुन आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती मिळवली होती.
या प्रकणावर मंगळवारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समोर सुनावणी झाली होती. त्याचा सहकारमंत्र्यांनी शनिवारी निकाल दिला. कारखानदारांच्या अपिलावर दिलेली स्थगीत उठवण्यात आली आहे.









