सुरेश पाटील / पुलाची शिरोली
ऐके काळी सिने कलाकार व कमळांच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेले पुलाची शिरोली हे गाव . सध्या गांजा व दारुची पार्टी , परप्रांतीय लोकांची गर्दी, मारामारी, गोळीबार, खून, वाढत्या चोरीच्या घटना यामुळे कोल्हापूरची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे शिरोली गाव गुन्हेगारांची राजधानी बनत आहे. हि अत्यंत चिंताजनक बाब लक्षात घेऊन गावातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीं व प्रशासनाने अशा टवाळखोर तरुणांना वेळीच पायबंद घालावा अशी मागणी नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे.
शिरोली गावाचे वैभव असलेल्या बिरदेव तलावात कमळांची फुलांची मांदियाळी बघायला मिळत होती. या फुलांमुळे गावाची ओळख महाराष्ट्रात होती. तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने पै. कै. बापूसो गावडे यांनी शिरोली गावाची आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच कालांतराने औद्योगिक वसाहतीत तयार होणाऱ्या वस्तूंमुळे शिरोली गावाचे नाव जगाच्या नकाशावर ठळकपणे कोरले गेले आहे. याचबरोबर कुस्ती, कबड्डी, नाटक, भजन, मर्दानी खेळ, लेझीम पथक, गुराळघरे, राजकीय नेतृत्व यासारख्या अनेक गोष्टींमुळे सर्वदूर गावाचा नावलौकिक झाला आहे.
गावाचा विकास तर झालाच पण औद्योगिक वसाहतीमुळे लोकसंख्याही ४० हजारांवर गेली. गेल्या काही वर्षांत अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये खून, चोरी, सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी मारामारी, गोळीबार, गांजा व दारू पिऊन पार्टीतल्या मारामारी, सावकारी, स्क्रॅप व्यवसायातील चोरी मारामारी, मंडळामधील वर्चस्व वादातून मारामारी या सारख्या अवैध घटना वारंवार घडल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपूर्वी शिरोली फाटा येथील एका हॉटेलमध्ये दारु पिऊन झालेल्या मारामारीत गणेश लोहार या युवकाचा झालेला खून, टवाळखोर तरुणांच्या त्रासाला कंटाळून इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या एका मुलीने केलेली आत्महत्या आणि बुधवारी दुपारी पंचगंगा नदी शेजारी सुरू असलेल्या दारू व गांजा पार्टीत दारुच्या कारणांमुळे विजापूर (कर्नाटक) येथील पण सध्या शिरोलीत स्थायिक झालेल्या अमित राठोडचा झालेला खून. यासारख्या अनेक घटनांमुळे जिल्ह्याची औद्योगिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या शिरोली गावाचे नाव गुन्हेगारांची राजधानी म्हणून ओळखले जाईल. अशी परिस्थिती निर्माण होत आहे. तरी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीं व प्रशासनाने व्यसनाधीन व टवाळखोर तरुणांच्या वेळीच मुसक्या आवळल्या पाहिजेत. तसेच त्यांना स्थानिक नेत्यांनी पाठींशी न घालता त्यांच्यावर वेळीच पायबंद घालावा. अशी मागणी नागरिकांच्यांतून होवू लागली आहे.
औद्योगिक वसाहतीच्या वाढीनंतर शेकडो परप्रांतीय कामगार शिरोलीत भाडोत्री पध्दतीने राहू लागले. या कामगारांना नशेचे साहित्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत झाली आणि त्यांना सेवा देण्याच्या नादात स्थानिक तरुणही भरकटू लागले आहेत. |