महागाव / प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे गेल्या वीस महिन्यांपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बंद होत्या. पण शासनाच्या आदेशाने बुधवारी 1 डिसेंबरपासून शासनाचे नियम पाळून प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणातून सुटका होणार आहे. साहजिकच विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर कमालीचा उत्साह दिसला. विद्यार्थ्यांनी शालेय परिसर गजबजला. पण कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूंमुळे पुन्हा शाळा बंद होऊन मुलांचे नुकसान होऊ नये. अशी भावना पालकांच्या चेहऱ्यावर होती.
राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्याने 17 मार्च 2020 पासून शाळा बंद करण्यात आल्या. त्या दरम्यान बारावी व दहावीच्या परीक्षा झाल्या. पण अन्य वर्गाच्या परीक्षा झाल्या नाहीत. गतवर्षी तर दहावी-बारावीच्या परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला व त्यानंतर 2021 मध्ये कोरोनाने उग्र रूप धारण केल्याने पुन्हा ज्ञानमंदिरे बंद झाली. राज्यात 15 ऑगस्टला नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. 4 ऑक्टोबरनंतर पाचवी ते आठवीचे वर्ग शासनाचे नियम पाळून सुरू करण्यात आले. आता राज्य शासनाने 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला, अन् त्याची बुधवारपासून अंमलबजावणी सुरू झाली.
गेल्या काही महिन्यांपासून मुले घरातच ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेत होती. ज्या गोष्टीपासून मुलांना लांब ठेवायचा विचार असायचा. त्याच वस्तूंशी मुलांना दोस्ती करावी लागली. पालकांना स्वतःच्या हाताने मोबाईल मुलांच्या हाती द्यावे लागले. त्याचा वाईट परिणाम मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. या ऑनलाईन शिक्षणाला आणि घरातील वातावरणाला मुले कंटाळली होती. अशा स्थितीत मुलांना दिलेले ऑनलाईनचं शिक्षण किती पचनी पडले, हा संशोधनाचा विषय आहे.
बुधवारपासून पुन्हा पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्याने सर्व वर्गामध्ये साफसफाई करण्यात आली आहे. शाळा सॅनिटायझर करून स्वच्छ करण्यात आल्या. मुलांना सोशल डिस्टन्स ठेवून बसवले. जागोजागी सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवून जोरदार तयारी करूनच शाळा सुरू झाल्या. शाळेत आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या चेहऱयावर कमालीचा आनंद अन् उत्साह होता. शालेय परिसर मुलांनी गजबजला होता.
प्रशासनाच्या आदेशानुसार एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकामध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवून देणे, कोरोना चाचणी करण्यास सांगणे, सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण व्हावे, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके, कोणतेही खेळ घेऊ नयेत, वर्गाचा कालावधी तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, विद्यार्थ्यांची रोज तपासणी करावी, संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावे आदी खबरदारीच्या सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करत ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत.