पुरामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत
प्रतिनिधी / विश्वनाथ मोरे
करवीर तालुक्यातील महे, कसबा बीड, आरे, सावरवाडी गणेशवाडी भागात तब्बल पाच दिवसानंतर लाईट सुरु करण्यात यश आले आहे. महापुरामुळे निर्माण झालेले नैसर्गिक संकट यामध्ये गेली पाच दिवस या गावांमध्ये मेन लाईन पाण्याखाली गेल्याने लाईट बंद होती. त्या गावांमध्ये घरामध्ये लाईट नाही, पिण्यासाठी चावीला पाणी नाही, मोबाईल व इतर उपकरणासाठी कोणतीच सोय नसल्यामुळे ग्रामीण भागातील पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
प्रतिवर्षी महापूर आला की, या भागांमध्ये मुख्य समस्या म्हणजे या गावांमध्ये लाईट प्रवाह बंद होतो. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्यापासून घरातील लाईट व इतर सोयी सुविधा यापासून वंचित राहावे लागते. महावितरणच्या कोगे सब स्टेशन मधून याचा मुख्य प्रवाह कसबा बीड पुलाच्या शेजारी असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरवरती आहे. पण जेव्हा पाण्याची पातळी वाढते, तेव्हा तो ट्रांसफार्मर पाण्याखाली जातो, पर्यायी सर्व गावांमध्ये जाणारी लाइट्स बंद होते. त्यामुळे महावितरणच्या कर्मचारी व गावकऱ्यांना याचा नाहक त्रास होत असतो.
गेली अनेक वर्षे निर्माण होणाऱ्या या समस्येमध्ये महे या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच निवास पाटील, त्यांचे सहकारी, आरे व कसबा बीडमधील तरुण कार्यकर्ते आणि महावितरणचे कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून पाण्याच्या मुख्य प्रवाहात पुलाजवळील पोलवर काम करतात. या पोलवर काम केल्यामूळे महे ,आरे ,गाडेगोंडवाडी, सावरवाडी क.बीड, गणेशवाडी, धोडेवाडी या गावचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास मदत झाली. यावेळी पाण्यात रस्सी घेऊन जितेंद्र पाटील, आशिष पाटील, रंगराव राऊत, रवींद्र पाटील होते. महावितरणचे जे ई नाकटे साहेब, विश्वजीत नाईक साहेब, ऑपरेटर विजय पाटील, असणारे वायरमन संग्राम भोसले, योगेश पाटील या सर्वांच्या सहकार्याने कसबा बीड परिसरातील विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.त्यांच्या या कार्याचे कसबा बीड परिसरातील सर्व भागातून कौतुक होत आहे.
पण प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने जीव धोक्यात घालून काम करणे कितपत योग्य आहे ? अशी कुजबूज कसबा बीड परिसरातील सर्व गावात चालू होती.
गरज सरो… वैद्य मरो… या म्हणीप्रमाणे महावितरणकडून वागणे
पूर आला की घाई गडबड करायची व लाईट सुरु करण्यासाठी पुराच्या पाण्यामध्ये उतरून प्रयत्न करायचे व नंतर विसरून जायचे असे किती वर्षे चालणार ? कसबा बीड पुलाशेजारी असणारा ट्रांसफार्मर हा महे गावाच्या कमानीजवळील विद्युत खांबास जोडल्यास या समस्येवर कायमचा उपाय होऊ शकतो. म्हणजेच भविष्यात या गावांमध्ये पूर परिस्थितीमध्ये सुद्धा लाईटची सोय राहू शकते. या गोष्टीची तात्काळ अंमलबजावणी महावितरण कंपनीकडून होणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रतिवर्षी महावितरण कर्मचारी व इतर तरुणांना आपला जीव धोक्यात घालून काम करण्याची गरज राहणार नाही.