वार्ताहर / कसबा बावडा
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेन्टर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च’ (स्टेम सेल अँड रिजनरेटीव्ह मेडिसिन) विभागाच्यावतीने शिराळा येथील ‘आयसेरा प्रायव्हेट लिमिटेड’ (iSERA) या कंपनीसोबत सामंज्यस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची नवी संधी मिळणार आहे.
आयसेरा या कंपनीने अॅन्टी कोविड सिरम तयार करण्यात यश आले आहे. मोनोक्लोनल अॅन्टीबॉडीवर आधारित या औषधाच्या सध्या मानवी चाचण्या सुरु आहेत. या कंपनीसोबतच्या करारामुळे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट, ट्रेनिंग व संयुक्त संशोधन करता येणार आहे. स्टेम सेल व मेडिकल बायोटेक्नोलॉजी या विभागांच्यावतीने सहयोग संशोधन, शोधनिबंध आणि पेटंट घेण्यास मदत होईल.
या करारावर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल व कुलसचिव डी. व्ही. व्ही. भोसले यांनी तर ‘आयसेरा’च्या वतीने संचालक डॉ. नंदकुमार कदम व डॉ. धैर्यशील यादव यांनी स्वाक्षऱ्या केल्या. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष गृह राज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे सर, विभागप्रमुख डॉ. के. एस. करूपाईल, डॉ. आश्विनी जाधव आदी उपस्थित होते.









