60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षावरील व्याधीग्रस्तां (कोमॉरबीड)चा समावेश
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोविड लसीकरणचा तिसरा टप्पा सुरु असून बुधवार (दि.3) पासून जिह्यातील 120 केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त (कोमॉरबीड) लाभार्थ्यांचा समावेश आहे. तरी संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर `कोविन ऍप’वर नोंदणी करावी व जवळच्या केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोनामुळे जिह्यात आतापर्यंत 3.5 टक्के इतके मृत्युचे प्रमाण झाले आहे. येणार्या काळात मृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. लसीकरणासाठी आशा वर्कर, अंगणवाडीसेविका, आरोग्य कर्मचारी आदींकडून घरोघरी जाऊन कोवीन ऍपवर नोंदणी करुन घेतील. तसेच तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, शिक्षक, कोतवाल, वॉर्ड अधिकारी आदींकडून जनजागृती केली जाणार आहे.कोविड लसीकरण केंद्र असलेल्या शासकिय व खासगी रुग्णालयांकडून त्या ठिकाणी येणार्या लाभार्थ्यांना स्पॉट रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
ते पुढे म्हणाले, `सीपीआर’सह शासकिय रुग्णालयात मोफत तर खासगी रुग्णालयात250 रुपयांना ही लस दिली जाणार आहे. शासकिय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण सुरु राहणार आहे. लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा
डोस घ्यायचा आहे. व्याधीग्रस्तांच्या लसीकरणासाठी डॉक्टरचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तरुण मंडळे, स्वयंसेवी संस्था आदींनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शाहू शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एम. मोरे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे प्राचार्य मानसिंग जगताप, बाबूराव कदम, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.
60 वर्षावरील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
लसीकरणासाठी खास करुन 60 वर्षावरील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, राजकीय व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधी व सदस्यांनी प्राधान्याने लसीकरण करुन घ्यावे. जेणेकरुन जनतेचा विश्वास वाढेल, असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले.
जिह्यातील 6 लाख 61 हजार लाभार्थ्यांना होणार लसीकरण
कोविड लसीकरणासाठी एकूण 6 लाख 61 हजार 948 लाभार्थी अपेक्षित आहेत. यामध्ये 5 लाख 9 हजार लाभार्थी हे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत. तर 1 लाख 52 हजार 948 लाभार्थी हे 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त (कोमॉरबिड) आहेत. त्यांना हे लसीकरण होणार आहे.
जिह्यातील 120 कोविड लसीकरण केंद्रे
केंद्रे संख्या
प्राथमिक आरोग्य केंद्रे 75
उपजिल्हा रुग्णालये/ ग्रामीण रुग्णालये 21
महानगरपालिका आरोग्य केंद्रे 08
खाजगी रुग्णालये 16
एकूण 120
जिह्यात 35 हजार 830 जणांचे लसीकरण
लाभार्थी नोंदणीकृत लाभार्थी लसीकरण झालेले लाभार्थी
60 वर्षावरील लाभार्थी 509000 – ö
45 ते 59 वयोगट व्याधीग्रस्त 152948 —
हेल्थकेअर वर्कर 38256 26965
फ्रंटलाईन वर्कर 29889 8975
एकूण 731373 35830









