– पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची कारवाई
प्रतिनिधी / कोल्हापूर
गुह्यांची उकल करण्यात अपयश, तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय रोखण्यात अपयशी ठरलेल्या डिबी (गुन्हे प्रकटीकरण पथक) पथकावर बरखास्तीची शुक्रवारी कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ही कारवाई केली. जिह्यात एकच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे डिबी पथक कायम ठेवण्यात आले आहे.
जिह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये डीबी पथक आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी डीबी पथकांना वारंवार सूचना दिल्या होत्या. हद्दीमधील अवैध व्यवसाय रोखा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, गस्त वाढवून चेन स्नॅचिंग, घरफोडÎा रोखा, गुन्हे प्रकटीकरणावर भर द्या, अशा त्या सूचना होत्या. मात्र यामध्ये जिह्यातील सर्वच डिबी पथके अपयशी ठरल्याचे चित्र दिसत होते. अनलॉकनंतर दुचाकी चोरी, घरफोडÎांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी नवीन वर्षातील पहिली क्राईम आढावा बैठक पोलीस मुख्यालयामध्ये पार पडली. यावेळी अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी डीबी पथकाच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच सर्वच डिबी पथके बरखास्त करुन त्यांची पुनर्रचना करण्याच्या सूचना दिल्या.
डीबी पथकात येण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा
नवीन डीबी पथके नेमण्यासाठी नवीन नियमावली करण्याची सूचना उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना दिली आहे. वर्षानुवर्षे डीबी किंवा एलसीबीमध्ये मक्तेदारी गाजविणाऱयांना यापुढे संधी देऊ नये. तरुण मुलांना व नव्या चेहऱयांना संधी देण्याच्या सूचना बलकवडे यांनी दिल्या आहेत. पोलीस निरीक्षकांनी आपल्या ठाण्यातील इच्छुकांची यादी तयार करुन ती उपअधीक्षकांकडे द्यावी लागणार आहे. ते इच्छुकांची परीक्षा घेणार आहेत. यानंतर या पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या परीक्षेमध्ये इच्छुकांना पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार, त्यांची गुन्हे करण्याची पद्धत, उपद्रवी घटक, संवेदनशील ठिकाणे यांची माहिती आहे काय, याची चाचणी घेतली जाणार आहे.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे डिबी पथक कायम
जिह्यातील केवळ जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील डिबी पथक कायम ठेवण्यात आले आहे. या पथकाने गत काही महिन्यात मोटारसायकल चोरी, चार चाकी चोरी, घरफोडी यासह कळंबा कारागृहात फेकण्यात आलेल्या मोबाईल, गांजा प्रकरणाचा तपास शिताफीने केला आहे. यामुळे या पथकावर कारवाई करण्यात आलेली नाही.









