कोविशिल्डचे 25 हजार डोस शिल्लक,लसीअभावी जिल्ह्यातील 30 केंदे बंद,कोविशिल्ड लसीचा जाणवतोय तुटवडा
कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
कोल्हापूर जिल्हा कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्यात अव्वल आहे. जिल्ह्याने लसीकरणाचे उद्दिष्ट वाढले आहे. त्या प्रमाणात सप्ताहाला 2 लाख 80 हजार प्रतिबंधक लस मागवण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा साठा कमी असल्याने गुरूवारी 30 केंद्रांवर लसीकरण थांबले. सध्या 26 हजार डोस शिल्लक असून ते शुक्रवारपर्यत पुरण्याची शक्यता आहे. कोविशिल्डचे 2 लाख 80 हजार डोस मागवले आहेत. ते सायंकाळपर्यत मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोना लसीकरणाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. यामध्ये राज्यात कोल्हापूर अव्वल ठरले आहे. हेल्थवर्कर्सचे 100 टक्के तर प्रंटलाईन वर्कर्सचे 127 टक्के लसीकरण झाले आहे. ज्येष्ठ नागरीक आणि 45 वर्षावरील नागरीकांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत लसीकरणाची 250 केंद्रे आहेत. त्यातील 30 केंद्रे कोविशिल्ड लसीच्या तुटवड्यामुळे गुरूवारी बंद राहिली. जिल्ह्याला कोविशिल्डचे 60 हजार डोस मिळाले होते. त्यातील 26 हजार डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील 17 खासगी केंद्रांवरही लस दिली जात आहे. जिल्ह्याला प्रत्येक सप्ताहात 2 लाख 80 हजार कोरोना प्रतिबंधक डोस लागत आहे. त्यानुसार आगाऊ मागणी नोंदवली जात आहे.
जिल्ह्यात कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देण्यात येत आहे. कोव्हॅक्सिनची लस भरपूर उपलब्ध आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस घेणाऱयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या लसीचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यासाठी 2 लाख 80 हजार कोविशिल्ड डोसची मागणी केली आहे. हे डोस शुक्रवारी सायंकाळपर्यत मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.
दरम्यान, शहरासह ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी 100 टक्के लसीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. अन्य विभागांना त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. राज्यस्तरावरून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास कोल्हापूरचा राज्यातील अव्वल क्रमांक कायम राहण्यास मदत होणार आहे.
राज्यात लसीकरणात कोल्हापूर अव्वल ः आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणात कोल्हापूर, भंडारा जिल्हा अव्वल ठरला आहे. लसोत्सव मोहिमेतही कोल्हापूर आघाडीवर राहिले आहे. गुरूवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. आरोग्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्याने लसीकरणात घेतलेल्या आघाडीबाबत प्रशंसोद्गार काढले.









