सहा तालुके ‘कोरोनामुक्ती’च्या मार्गावर
हातकणंगलेतील निलेवाडीत कोरोनाचे पाऊल नाही,
सात महिन्यांनंतरही 87 गावे कोरोना संसर्गमुक्त
भुदरगड, चंदगड, राधानगरी, शाहूवाडीत 10 हून अधिक गावे संसर्गहीन,
सहा तालुके ‘कोरोनामुक्ती’च्या मार्गावर
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
जिल्ह्यातील 1 हजारांहून अधिक गावे कोरोनाशी सामना करत होती, त्यावेळी 87 गावे कोरोनापासून दूर राहिली. या गावांतील उपाययोजनांनी कोरोनाला नो एंट्री केली. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी सात महिन्यांनंतरही संसर्गहिन राहिले आहे. अन्य तालुक्यांत संसर्गहिन गावांची संख्या 5 ते 12 पर्यत आहे. कोरोना रूग्णांना बाहेरच रोखणे अन् गावांत कोरोना प्रतिबंधाशी निगडीत नियमांची कडक अंमलबजावणी यातून हे शक्य झाले आहे. जिल्ह्यातील सहा तालुके सद्यस्थितीत कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7 महिन्यांत 8 वरून 46 हजारांवर पोहोचली, कोरोना बळींची संख्या दीड हजारांवर गेली. पण ऑक्टोबरच्या पहिल्या सप्ताहात कोरोनाचा संसर्ग कमी झाला, अन् कोरोनाची धास्ती अन् भीतीही कमी होऊ लागली आहे. प्रशासन यंत्रणा थोडासा मोकळा श्वास घेत आहे. केअर सेंटर कमी होत आहेत. व्हेटिलेटर, ऑक्सिजन बेड मोठ्या संख्येने उपलब्ध होत आहेत. जिल्हा 80 टक्के कोरोनामुक्त होऊ लागला आहे. त्यातूनच प्रशासनाने नॉन कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी पावले उचलली आहेत. हे सकारात्मक चित्र असताना जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना 87 गावांना मात्र कोरोनाला नो एंट्री केली.. गावांनी `सीमाबंद’ केल्याने कोरोनाने त्यांना लांबूनच टाटा केला.
आजरा तालुक्यातील मासेवाडी, कोरिवडे, देऊळवाडी, इंटे, आवंडी, सुळेरान, किटवडे, खानापूर या 8 गावांत रूग्ण सापडलेला नाही. भुदरगड तालुक्यातील तांब्याचीवाडी चिक्केवाडी, देवर्डे, देवकेवाडी, नवरसवाडी, न्हाव्याची वाडी, पारधेवाडी, मिणचे बुद्रुक, वरपेवाडी, हेळेवाडी, चांदमवाडी, कोळवण पाळेवाडी, पंडीवरे ही 12 गावे आजही कोरोनामुक्त आहेत. चंदगड तालुक्यातील आंबेवाडी, इसापूर, जांबरे, कोलिक, कळसगादे, कलिवडे, म्हाळेवाडी, नागवे कोळींद्रे, पुंद्रा, सरोळी, दिंडलकोपवाडी अशी 11 गावे संसर्गहिन आहेत. गगनबवडा तालुक्यातील खोकुर्ले, शेणवडे, कडवे, साळवण, कोदे बुद्रुक आजही कोरोनामुक्त आहेत. गडहिंग्लजमधील बिदेवाडी, बुगडीकट्टी, चिंचेवाडी, हणमंतवाडी, हुगणीनिहाळ, कडलगे, कुंबळहाळ, नंदनवाड, निलजी या 9 गावात कोरोना पोहोचलाच नाही.
हातकणंगले तालुक्यातील निलेंवाडी गावात आजही एकही कोरोना रूग्ण नाही. करवीर तालुक्यात कोरोना रूग्ण न दिसून आलेली 6 गावे आहेत. यामध्ये उपवडे, केकतवाडी, गर्जन, गाडेगोंदवाडी, नितवडे, हिरवडे यांचा समावेश आहे. कागल तालुक्यातील 5 गावे कोरोनामुक्त आहेत. यामध्ये अर्जुनी, गलगले, नंद्याळ, ठाणेवाडी, बोळावीचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्यातील 9 गावे आजही कोरोना संसर्गापासून दूर आहेत. यामध्ये आबर्डे, बादेवाडी, चव्हाणवाडी, जेऊर, कोलिक, पिसात्री, तांदुळवाडी, वेखंडवाडी, वाळवेकरवाडी, कोदवडेचा समावेश आहे.
राधानगरीतील सावर्डे, वडÎाचीवाडी, दुर्गमानवाड, केळोशी खुर्द, कोनोली असंडोली, पडसाळी, पाटपन्हाळा, रामणवाडी, कुंभारवाडी, राजापूरवाडी, पडसाळी तर शाहूवाडीतील खेडे, ऐनवाडी, गेळवडे, खोतवाडी, सावर्डे खुर्द, सोनुर्ले, करंजफेण, माळापुडे, चांदोली, गिरगाव, आलतुर ही गावे संसर्गहिन आहेत. या गावांनी सामुहिक प्रयत्नांतून संसर्गाला मुठमाती दिली आहे.
जिल्ह्यात एकावेळी हायरिस्क कोरोना रूग्णांची संख्या काही हजारांत होती, सद्यस्थितीत ती फक्त 174 आहे. जिल्ह्यात 10 हजारांवर असलेले कोरोना रूग्ण सध्या 6 हजारांखाली आली आहे. जिल्ह्यातील प्रायव्हेट केअर सेंटरची संख्या रूग्ण घटल्याने कमी झाली आहे. कोरोना हेल्थ सेंटरमधील बेडही आता शिल्लक रहात आहेत. त्यामुळे आता `गो कोरोना’ चळवळीसाठी मास्क अन् सॅनिटायझेशन वापराची चळवळ अधिक गतीशील करणे आणि त्यासाठी प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे बनले आहे.
जिल्ह्यातील कोरोना संसर्गापासून अलिप्त गावे
आजरा 8
भुदरगड 12
चंदगड 11
गगनबावडा 6
गडहिंग्लज 9
हातकणंगले 1
करवीर 9
कागल 5
पन्हाळा 9
राधानगरी 10
शाहूवाडी 11
जिल्ह्यात 3 मे पुर्वी आणि 9 ऑक्टाबरची सद्यस्थिती
रूग्णसंख्या 123 1770
आरक्षित बेड 3896 31039
परकीय नागरीक 820
बाधीत शहरातून आलेले 86584 98586
क्वारंटाईन पूर्ण केलेले 86678 46394
घरी कोरोटाईन झालेले ……… 2899
…………………………………………….
आरोग्य विभागातील उपाययोजना
हॉस्पिटल, केअर सेंटर बेड तपासणी दाखल रूग्ण
आयसोलेटेट हॉस्पिटल 5 1111 233 638
कोरोना हेल्थ सेंटर 13 1484 123 430
कोरोना केअर सेंटर 51 4685 145 802
प्रायव्हेट केअर सेंटर 66 1618 17 305
………………………………………………………………………………….
कोरोना रूग्णांच्या तपासणीवर दृष्टीक्षेप
संशयित रूग्ण स्वॅब संख्या 1,95,602
रिपोर्ट निगेटीव्ह रूग्णसंख्या 1,46,659
पॉझिटिव्ह रिपोर्ट रूग्णसंख्या 46,509
कोरोनामुक्त रूग्णसंख्या 38,812
कोरोना बळींची संख्या 1,535
जिल्ह्यात कोरोना रूग्ण, बळींत पुरूषांचे प्रमाण अधिक
जिल्ह्यात कोरोनाने 13 हजार 581 महिला बाधित झाल्या हे प्रमाण लोकसंख्येच्या 37 टक्के आहे. 22 हजार 100 पुरूष बाधित झाले. त्यांची टक्केवारी 63 टक्के आहे. कोरोनाने 293 महिलांचा तर 830 पुरूषांचा मृत्यू झाला. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात 48 टक्के, शहरी भागात 48.40 टक्के तर अन्य 3.60 टक्के इतका आहे.









