पहिल्या लसीनंतर लाभार्थ्यांत प्रतिबंधक अँटीबॉडीज तयार
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात 16 जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांना सोमवारी, 15 फेबुवारीला दुसरा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे कोरोना प्रतिबंधक अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे प्रतिबंधक लसीचे सकारात्मक परिणाम असल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांत आहे. दरम्यान, सोमवारपासून सर्वसामान्यांना प्रतिबंधक लस देण्याचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. जिल्ह्यात सप्ताहभरात कोरोनाच्या सक्रीय रूग्णांत वाढ झाली आहे. शहर परिसरासह ग्रामीण भागात नवे रूग्ण दिसून येत आहेत.
शासकीय’पेक्षा `प्रायव्हेट’ लॅबमध्ये पॉझिटिव्ह येणाऱया रिपोर्टची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यात 131 सक्रीय रूग्ण आहेत. रोज सरासरी सहाशेहून अधिक संशयित कोरोना रूग्णांची तपासणी होत आहे. आजपर्यतची कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 50 हजार 85 आहे. कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 225 वर आहे. शिक्षकांची कोरोना तपासणी संख्या वाढली आहे. सोमवारपासून महाविद्यालये सुरू होत आहेत. दुसरीकडे शाळाही आता 11 ते 5 अशा पुर्णवेळ भरण्यास सुरूवात होत आहे.
देशभर 16 जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात 11 आरोग्य केंद्रात आरोग्याशी निगडीत डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, आशा स्वयंसेविकांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्याला गेल्या सोमवारी सुरूवात झाली. यामध्ये पंटलाईन वर्कर्स पोलीस, होमगार्ड आणि महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. लसीकरण केंद्रांची संख्या 20 वरून 25 वर पोहोचली आहे. सोमवारी, 15 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात लस घेतलेल्या लाभार्थ्यांना सोमवारपासून दुसरा बुस्टर डोस देण्यास सुरूवात होणार आहे.
कोरोना प्रतिबंधक लस पहिल्या दिवशी घेतलेल्या लाभार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे कोरोना प्रतिबंधक, अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत, त्यामुळे लसीचा परिणाम सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया सीपीआर हॉस्पिटलमधील कार्डियॉलॉजिस्ट डॉ. अक्षय बाफना यांनी दिली. जिल्ह्यात 28 दिवसांत, आजपर्यत 21 हजार 131 लाभार्थ्यांनी प्रतिबंधक लस कोव्हिशिल्ड घेतली आहे. जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, सेवा, ग्रामीण रूग्णालयांसह आता प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि प्रायव्हेंट हॉस्पिटल्समध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे सुरू झाली आहेत. लाभार्थ्यांची संख्या वाढल्याने लसीकरणाची टक्केवारीही वाढली आहे.









