प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हयातील गर्दीच्या ठिकाणांहून मोबाईल लंपास करणाऱ्या कर्नाटक येथील आंतरराज्य टोळीला जरेबंद करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून 3 लाख 77 हजार 500 रुपये किमतीचे 35 मोबाईल व लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सायबर सेल यांच्या संयुक्त पथकाने हि कारवाई केली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता जिल्ह्यातील 11 पोलीस ठाण्यातील 34 मोबाईल चोरीचे गुन्हे उघड झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, टोळीतील अनिल शिवाप्पा बंडीवडर (रा. हुलगीणकोप्पा, ता हणगल, जि. हवेरी) सतीश बसवराज भोई (रा. कुडची, ता. अथणी, जि. बेळगांव), शशी बसवंत वडर (वय 27), प्रदीप लक्ष्मण भद्रावती उर्फ वडर, राजेश गोपाल मेहरवाडे (वय 27, सर्वजण रा. हणगल जि. हवेरी, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून यापैकी अनिल, शशी आणि राजेश यांना अटक केल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक शशीराज पाटोळे उपस्थित होते.
जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्याने गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथके तयार करण्याची सुचना पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना केली होती. त्यानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे व त्यांच्या पथकांकडून तपास सुरु होता. यादरम्यान गोपनीय सुत्राकडून रेकॉर्डवरील मोबाईल चोरटा अनिल बंडी वडर हा लक्ष्मीपुरी येथे चोरीचे मोबाईल विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार येथ सापळा रचून अनिल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याच्याजवळ दोन चोरीचे मोबाईल मिळून आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता साथीदार प्रदीप वडर आणि सतीश भोई यांच्या साथीने कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून मोबाईल चोरत असल्याची कबुली दिली. यानंतर मोबाईल चोरटÎांच्या या साखळीचा छडा लावण्यात पोलीसांना यश आले.
असे चालत होते साखळीचे काम
अनिल, प्रदीप आणि सतीश हे जिल्ह्यातील गर्दीची ठिकाणे, आठवडी बजार येथील मोबाईल चोरत असत. हे मोबाईल ते त्यांच्या गावी हणगल येथे घेवून जात असत. त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल शशी वडर स्वतःच्या ताब्यात घेत होता. शशी हा येथील गांधी सर्कल मधील राजेश मेहरवाडे यांच्या सोनी मोबाईल दूकानातून लॅपटॉपद्वारे मोबाईलचे लॉक काढणे, डाटा डिलिट करणे, आयएमईआय नंबर बदलून पुढे मोबाईलची विक्री करत होता. तसेच मोबाईल चोरीचे आहेत हे माहित असूनही राजेश हा यामधील काही मोबाईल स्वतःच्या दुकानातून विक्री करत होता. त्यामुळे राजेश यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
प्रदीप आणि सतीशला सांगलीत अटक
टोळीमधील प्रदीप वडर आणि सतीश भोई हे दोघे सध्या सांगली जिल्ह्यातील मोबाईल चोरीच्या गुन्हात अटक आहेत. त्यांच्यावर 15 मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर या सर्व गुन्हÎांमध्ये अनिल हा फरार असून त्याल्या अटक करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले.
आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
सध्या अनिल, शशी आणि राजेश यांना अटक करण्यात आली आहे. तर प्रदीप आणि सतीश सांगलीमध्ये अटकेत आहेत. त्यांना चौकशीसाठी लवकरच कोल्हापूरात आणले जाणार आहे. त्यांच्याकडूनही अजून काही मोबाईल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.ञ
शशी वडरला सदर बाजारातून अटक
चौकशी दरम्यान चोरीचे मोबाईल विक्रीसाठी शशी याच्याकडे देत असल्याचे अनिल याने सांगितले. तसेच शशी हा सदर बाजारमध्ये आल्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार शशी वडर याला सदर बझार येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.