जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाऊनची नियमावली जाहीर, शनिवारी मध्यरात्रीपासून होणार अंमलबजावणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
देशात उच्चांकी झालेला कोल्हापूरचा कोरोना मृत्युदर आणि दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शनिवारी मध्यरात्री बारापासून रविवार (दि.23)पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याची नियमावली गुरुवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली. यामध्ये दुध सेवा, भाजीपाला विक्री व गॅस वितरण सकाळी 6 ते 10 व दुपारी 4 ते सायंकाळी 7 यावेळेत घरपोच सेवा सुरु राहणार आहे.
तसेच वैधकिय सेवा औषध दुकाने, वाहतुक व वितरण व्यवस्था, ऑक्सिजन उत्पादन करणारे व पुरवठा करणारे उद्योग, एटीएम, पोस्ट ऑफीस, वृत्तपत्र कार्यालये, इंटरनेट यंत्रणा, दुरध्वनी, मोबाईल सेवा पुरविणार्या कंपन्यांची कार्यालये, सर्व प्रकारची माल वाहतुक वगळता सर्वच बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी रात्री याबाबतचे आदेश काढले.
जिल्ह्यात आठ दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय बुधवारी (दि. 12) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार आमदारांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. लॉकडाऊनची नियमावली गुरुवारी जाहीर करण्याचेही यावेळी ठरले. त्यानुसार गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आदेश काढून लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली.