प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी 250 केंद्रांवर 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरूवात झाली. 45 वर्षावरील सर्वांनाच लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. शहरातील अनेक केंद्रावर लसीसाठी रांगा लागल्या, गर्दी झाली.
जिल्ह्यात लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात 11 लाख 50 हजार 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातत त्यासाठी 250 केंद्रे केली आहेत. या केंद्रांवर गुरूवारी लसीकरणाला सुरूवात झाली. लाईन बाजार येथील सेवा रूग्णालयात गुरूवारी सकाळपासून 45 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरूवात झाली. लस घेताना आता व्याधीग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र लागणार नाही. आयडी प्रुफ असलेले आधारकार्ड दाखवल्यास ही लस मिळणार आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील आरोग्यसेवकांचे 95 टक्के लसीकरण पुर्ण झाले आहे. पंटलाईन वर्कर्सचे 100 टक्के लसीकरण झाले आहे. व्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरीकांचे 50 टक्क्यांवर लसीकरण पोहोचले आहे. या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशभर गुरूवारी लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात 45 वर्षावरील सर्वांना लस देण्यास प्रारंभ झाला. शहरात महापालिकेची 8 नागरी आरोग्य केंद्रे, तसेच पंचगंगा हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल, सेवा रूग्णालय आणि सीपीआर हॉस्पिटलमध्ये या लसीसाठी 45 वर्षांवरील व्यक्तींनी गर्दी केली होती. काही ठिकाणी त्यासाठी रांगाही लागल्याचे दिसून आले.









