प्रतिनिधी / कोल्हापूर
भारत बायोटेकच्या तिसऱया टप्प्यातील कोव्हॅक्सिन लसीकरणाला सीपीआर हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सुरूवात झाली. सायंकाळपर्यत 21 जणांना ही लस देण्यात आली. जिल्ह्यातील पहिली कोव्हॅक्सिन लस 77 वर्षीय माजी सैनिकाला देण्यात आली. बुधवारपासून 31 डिसेंबरपर्यत रोज 100 जणांना लस दिली जाणार आहे.
गोवा येथील क्रोम कंपनीने येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी कोव्हॅक्सिन संदर्भात चर्चा केली. भारत बायोटेक कंपनीने गोव्यात त्यांच्या कोव्हॅक्सिनच्या तिसऱया टप्प्यातील लसीकरण नोव्हेंबरमध्ये सुरू केले. कोल्हापूर जिल्ह्यात या लसीकरणाला आयसीएमआरने परवानगी दिली, पण राज्याच्या आरोग्य सचिवांची परवानगीसाठी पत्रव्यवहार सुरू होता. सोमवारी रात्री उशिरा यासंदर्भातील मेल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाली. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या प्रायोगिक लसिकरणाला परवानगी मिळाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना सांगितले. त्यानंतर दुपारी प्रायोगिक लसिकरणाच्या या तिसऱया टप्प्याला सीपीआरमध्ये सुरूवात झाली.
जिल्ह्यात क्रोम कंपनीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मदतीने 1200 हून अधिक जणांचा सर्वे केला होता. त्यातील 214 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. उर्वरित लोंकाना आता भारत बायोटेक कंपनीची लस देण्यात येणार आहे. यातील पहिली लस्ना जिल्ह्यातील 77 वर्षीय माजी सैनिकाला देण्यात आली. सायंकाळपर्यत 21 जणांना ही लस देण्यात आली आहे. पहिली लस देताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. सुनीता रामानंद, डॉ. विजय बर्गे, डॉ. विठ्ठल कारंडे, क्रोम कंपनीचे डॉ. धनंजय लाड, कोव्हॅक्सिन समन्वयक रतन पाटील, तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, सीपीआरमध्ये तिसऱया टप्प्यातील प्रायोगिक लसिकरणाला सुरूवात झाली, पण याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना नव्हती, लसिकरणाबाबत इतकी गोपनियता होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाताही लसीकरण प्रारंभावेळी दिसून आले नाहीत.
सचिवाकडून उशिरा परवानगी मिळाल्यामुळे काही उच्च पदस्थ अधिकाऱयांना ही लस देण्याचे नियोजन होते, पण बुधवारपासून 31 डिसेंबरपर्यत जिल्ह्यातील 1 हजार जणांना कोव्हॅक्सिन देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. लाड यांनी दिली.
Previous Articleप्रलंबित कृषी पंपाच्या जोडण्या देण्याचा राज्य शासनाचा निर्णय
Next Article बोगस उतारे काढून शासकीय जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण









