जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या तीनशेवर
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात सोमवारी दुसऱया दिवशीही कोरोनाने 20 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या 302 झाली आहे. रात्रीपर्यत 781 इतके नवे रूग्ण झाले. त्यातून आजपर्यतच्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 11 हजारांवर पोहोचली. रात्रीपर्यत 266 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 4 हजार 603 झाली आहे. सोमवारीही हातकणंगले तालुक्यात कोरोनाने 10 जणांचा बळी घेतल्याने प्रशासनाच्या युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत.
जिल्हय़ात सोमवारी इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील 56 वर्षीय पुरूष, नेज येथील 70 वर्षीय वृद्ध, कबनूर येथील 65 वर्षीय वृद्ध, तारदाळ येथील 75 वर्षीय वृद्ध, कबनूर येथील 80 वर्षीय वृद्धा, इचलकरंजी येथील कुडचे मळा परिसरातील 72 वर्षीय वृद्ध, केटकाळेनगर येथील 59 वर्षीय पुरूष, सुतार मळा येथील 82 वर्षीय वृद्धा, आसरानगर येथील 65 वर्षीय वृद्ध आणि शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील 36 वर्षीय तरूण, अब्दुललाट येथील 53 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला.
कोल्हापुरात नागाळा पार्क येथील खासगी हॉस्पिटलमध्ये कागल येथील गहिनीनगरातील 35 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. शास्त्राrनगर येथील हॉस्पिटलमध्ये हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथील 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. इचलकरंजीतील 61 वर्षीय वृद्धाचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. शास्त्रीनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील निपाणी येथील 51 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. अतिग्रे येथील केअर सेंटरमध्ये वाठार तर्फ वडगाव येथील 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये करवीर तालुक्यातील शिये येथील 74 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
सीपीआरमध्ये शहरातील टाकाळा येथील 65 वर्षीय वृद्ध, उत्तरेश्वर पेठ येथील 60 वर्षीय महिलेचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला तर आयसोलेशन हॉस्पिटल येथे मंगळवार पेठेतील 57 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. या तीन कोरोना मृत्यूमुळे शहरातील कोरोना बळींची संख्या 65 झाली आहे. दिवसभरातील 20 बळींमुळे आजपर्यत 302 कोरोना बळी झाले. यामध्ये ग्रामीण भागातील 109, नगरपालिका क्षेत्रात 117, कोल्हापूर शहरात 65 तर अन्य 11 मृतांचा समावेश आहे.
जिल्हय़ात सोमवारी रात्रीपर्यत 2 हजार 292 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 265 जणांचे स्वॅब घेण्यात आले. सद्यस्थितीत 6 हजार 156 रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत 266 जणांना डिसचार्ज दिल्यामुळे आजपर्यत 4 हजार 603 कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, सायंकाळी 6 पर्यत जिल्हय़ात 622 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 4, भुदरगड 26, चंदगड 7, हातकणंगले 82, कागल 18, करवीर 83, पन्हाळा 32, राधानगरी 3, शाहूवाडी 10, शिरोळ 38, नगरपालिका क्षेत्रात 155, कोल्हापूर शहरात 150, अन्य जिल्हय़ातील 15 रूग्णांचा समावेश आहे. सोमवारी जिल्हय़ात पॉझिटिव्ह रूग्णसंख्येने 11 हजार 61 चा टप्पा ओलांडला आहे.
दरम्यान, सायंकाळपर्यत आलेल्या 1 हजार 31 कोरोना रिपोर्टमध्ये 597 निगेटिव्ह तर 432 पॉझिटिव्ह आले. अँटीजेन टेस्टचे 509 रिपोर्ट आले. त्यातील 477 निगेटिव्ह तर 32 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसभरातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 622 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, 11061
कोरोनामुक्त रूग्ण ः 4603
उपचार घेत असलेले रूग्ण ः 6156
कोरोना बळी ः 302