: देवगिरी कृषी पर्यटन केंद्राला भेट
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्याला निसर्गतः लाभलेली सुपिक जमीन, पुरेसे पाणी आणि पोषक हवामानामुळे असणारी हिरवीगार शेती, तसेच जिह्यातील विविध पर्यटन स्थळी येणारे पर्यटक यामुळे जिल्ह्यात कृषी पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित पर्यटन दिन सप्ताहाच्या सहाव्या दिवशी बांदिवडे (ता. पन्हाळा) येथील `देवगिरी कृषी पर्यटन केंद्रा’ला जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देवून या केंद्राची माहिती जाणून घेतली. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, शाहूवाडी-पन्हाळयाचे प्रांताधिकारी अमित माळी, पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, उपाध्यक्ष सचिन शानभाग, सचिव सिद्धार्थ लाटकर, वेबसाईट डिझायनर मंदार वैद्य, क्रेडाईचे आदित्य बेडेकर, सुहास वायंगणकर, निसर्गमित्र अनिल चौगुले, वासीम सरकवास, देवगिरी पर्यटन केंद्र प्रमुख सुखदेव गिरी, नामदेव गिरी, ऍड. निलांबरी गिरी, तानाजी बुवा, कृषी महाविद्यालयाचे योगेश बन, सरपंच शिवाजी माळवी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते http://www.devgirifarm.com या वेबसाईट चे लोकार्पण व लोगोचे अनावरण करण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील दुर्मिळ वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी गोपूजन करुन रोपवाटिका, सौर वाळवण यंत्र, कारवीच्या फांद्यांपासून तयार केलेले विश्रांतीगृह, सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शिवारफेरी केली. या केंद्रात कृषी पर्यटनाची अभिनव संकल्पना साकारली असून स्थानिकांना रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने जिह्यातील विविध भागात अशी कृषी पर्यटन केंद्रे निर्माण व्हायला हवीत, असे मत जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केले.
डोंगर उतारावरील वेडीवाकडी वळणे, भात खाचरे व हिरवीगार झाडेझुडपे, खळाळणारा धबधबा अशा निसर्गरम्य वातावरणात देवगिरी कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रातील वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन व कचरा व्यवस्थापन आदी बाबींची अंमलबजावणी या पर्यटन केंद्रात करण्यात आली आहे. शेती व्यवसाय करताना जोडधंदा करुन रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरु केले आहे, असे सुखदेव गिरी यांनी सांगितले.