प्रतिनिधी / कोल्हापूर
लस तुटवड्यामुळे जिल्ह्यातील अडीचशेपैकी फक्त 150 केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस गुरूवारी लाभार्थ्यांना मिळाली. शहरातील 2 नागरी केंद्रांवर लस दिली जात असून 7 केंद्रांत लस नसल्याने ती बंद राहिली. त्यामुळे गुरूवारी लसीसाठी `सीपीआर’मध्ये गर्दी झाली. आरोग्य विभागाकडे 49 हजार डोस शिल्लक आहेत. ते शुक्रवारी वापरले जातील, पण त्यानंतर फक्त 50 केंद्रांतच लस मिळण्याची शक्यता आरोग्य विभागातून व्यक्त करण्यात आली.
जिल्ह्यात आजपर्यत 5 लाख जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गुरूवारी शहरातील सदर बाजार व शिवाजी पेठेतील फिरंगाई नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू होते. अन्य 7 नागरी केंद्रांवर लसीचा तुटवडा असल्याने रांगा लावू नयेत, असे फलक लावले होते. या केंद्रांवर शुकशुकाट होता. त्यामुळे अनेकांनी सीपीआर हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्राकडे धाव घेतली. सद्यस्थितीत सीपीआर हॉस्पिटल, सेवा रूग्णालय, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल आणि पंचगंगा हॉस्पिटलमध्ये लस दिली जात आहे.
आरोग्य विभागाकडे 49 हजार डोस शिल्लक आहेत, ते शुक्रवारपर्यत वापरता येणे शक्य आहे. त्यानंतर आणखी 100 केंद्रे लस तुटवडÎामुळे बंद राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली, जनजागृतीमुळे लाभार्थ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी वाढत आहे. पण मर्यादित लस असल्याने त्याचा परिणाम लसीकरणावर होत आहे. राज्यात जिल्ह्याने 5 लाखांचे उद्दिष्ट गाठत अव्वल क्रमांक पटकावला आहे. आता लस तुटवडÎामुळे 15 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यावर परिणाम होणार आहे.
2 लाख 80 हजार डोस शुक्रवारी मिळणार
जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई म्हणाले, जिल्ह्यात लसीचा तुटवडा आहे. गुरूवारी 100 केंद्रावर लस तुटवडा होता. 150 केंद्रांवर लसीकरण उद्दिष्ट पुर्ण झाले. शुक्रवारी सायंकाळपर्यत आणखी 100 केंद्रांवर लस तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने आणखी 2 लाख 80 हजार लस मागवल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यत ती मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे एक तृतीयांश उद्दिष्ट साध्य केल्याचे त्यांनी सांगितले.
चार जिल्ह्यांसाठी इर्मजन्सीसाठी 30 वाईल्स शिल्लक
आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आजपर्यत कोविशिल्डच्या 8 लाख 97 हजार 840 लस तर कोव्हॅक्सिनच्या 1 लाख 20 हजार 530 लस असा एकूण 10 लाख 18 हजार 370 लसीचा पुरवठा चार जिल्ह्यांना केला आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात लस दिली आहे. आता या कार्यालयाकडे फक्त 30 वाईल्स इमर्जन्सीसाठी उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. बोरसे यांनी दिली.
Previous Articleसारथीच्या निबंधकांची शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट
Next Article लस पुरवठ्यात केंद्राचा दुजाभाव : अजित पवार









