प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या 48 वर आली आहे. प्रादूर्भाव कमी झाल्याने दररोज आढळून येणारे रुग्ण आणि डिस्चार्ज घेणार्या रुग्णांचे प्रमाण पाहत जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात केवळ दोन रुग्ण आढळून आले. तर सात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनाच्या पहिल्या आणि दूसर्या लाटेने जिल्ह्यात थैमान घातले. दोन्ही लाटेत मिळून जिल्ह्यात 2 लाख 6 हजार 725 इतके बाधित आढळून आले. यापैकी 2 लाख 881 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 5 हजार 796 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचा धसका समस्त नागरिकांनी घेतला. याकाळात कोरानापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाची तर कोरोना बाधित झालेल्या रुग्णाला बेड उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांची प्रचंड धावपळ झाली. कोरानाचे हे भयानक संकट सध्या जिल्ह्यातून ओसरतानाचे चित्र आहे. गुरुवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आरटीपीसीआर आणि अँटीजेनच्या 529 अहवालांमध्ये एकही रुग्ण पॉझिटीव्ह प्राप्त झाला नाही. तर खासगी लॅब आणि हॉस्पिटलकडून प्राप्त झालेल्या 337 अहवालांमध्ये दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले.