प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा बँकेकडून आजतागायत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी आणि तीन लाखापर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याज दराने दिले जात होते. मात्र 1 एप्रिल 2021 पासून तीन लाखापर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी दिले जाणार असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली. अपात्र कर्जमाफी रद्द झाल्यामुळे अनिष्ट दुराव्यात सापडलेल्या विकास सेवा संस्थांची व्याज आकारणी बंद करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रविवारी ई लॉबी इमारतीचे भूमीपूजन झाले. मोबाईल व्हॅन, मायक्रो एटीएम व युपीआय सेवेचा शुभारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत हेते.
मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बँकेमार्फत शेतकऱयांना काही तरी फायद्याची योजना द्यावी याबाबत आमदार पी.एन.पाटील नेहमी आग्रही असतात. दरवर्षी बँकेकडून 18 ते 20 कोटीचा इन्मक टॅक्स भरला जातो. त्यामुळे तीन लाखापर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी दिल्यास बँकेला इन्मक टॅक्समध्ये 7 ते 8 कोटींची सवलत मिळेल आणि शेतकऱयांचाही फायदा होईल असे पी.एन.पाटील यांचे म्हणणे असायचे. याबाबत त्यांनी बँकेच्या प्रत्येक सभेमध्ये पाठपुरावा केला. त्यांच्या आग्रहाचा सन्मान ठेवून बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मंजूर केला जाणार आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2021 पासून 3 लाखापर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी दिले जाणार असून शेतकऱयांना त्याचा फायदा होणार आहे. पण पैशाची गरज नसलेल्या शेतकऱयांनी मुदतबंद ठेव जिल्हा बँकेतच ठेवावी. अन्यथा कर्ज आमच्याकडे आणि ठेव दुसऱया बँकेत ठेऊ नये, अशी कोपरखळीही मुश्रीफ यांनी मारली.
बँकेने नव्याने सुरु केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण भागातील अनेक शेतकरी अडाणी आहेत. त्यांना साधा धनादेश देखील लिहीता येत नाही. त्यामुळे तो शेतकरी डिजिटल पेमेंटची प्रक्रिया कसा समजून घेतो, याची सुरुवातीला भिती होती. पण भविष्यात जिल्हा बँक शेतकऱयांपुरती मर्यादित ठेवता येणार नाही. त्यामुळे उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांना वैयक्तीक कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. पण त्यांना पैसे काढणे व भरण्यासाठी बँकेत जाऊन रांगेत उभारणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्याकडून डिजिटल पेमेंटची सेवा उपलब्ध करण्याची बिनंती केली जात होती. त्याची दखल घेऊन मायक्रो एटीएम आणि यूपीआय सेवा सुरु केली आहे. आज बँकेकडे ठेवी जास्त आगणि कर्ज घेणारे कमी झाले असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
नाबार्डचे विशेष आभार
जिल्हा बँकेला तीन मोबाईल व्हॅन आणि तीनशे मायक्रो एटीएम दिल्याबद्दल मुश्रीफ यांनी नाबार्डचे आभार मानले. या व्हॅनमध्ये एटीएम सुविधेसह 3 कोटीपर्यंतची रक्कम बँकांकडे पोहोच करण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी नाबार्डने 67 लाखांचे अनुदान दिल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
कोरोनाच्या नवीन विषाणू संसर्गाबाबत 5 जानेवारीपर्यंत खबरदारी घ्या
कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा जन्म झाला आहे. त्यामुळे पुन्हा धडकी भरली आहे. त्यापार्श्वभूमीवर ब्रिटनमधून भारतात येणारी विमानसेवा बंद केली असली तरी तत्पूर्वी 10 हजार नागरीक भारतात आले आहेत. तर विमानसेवा बंद केल्यानंतर 1 हजार नागरीक भारतात दाखल झाले आहेत. त्यांच्यापासून संसर्ग होण्याचा धोका असल्यामुळे 5 जानेवारीपर्यत सर्वांनी मास्क वापरून सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
नियमित कर्जदारांना लवकरच 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान
महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनुसार दोन लाखापर्यंत थकबाकी असणाऱया शेतकऱयांना कर्जमाफी दिली आहे. पण ज्यांनी जून 2019 पूर्वी नियमित कर्ज परतफेड केली आहे, त्यांना 50 हजारांचा प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. तर दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱयांनी वरील रक्कम भरल्यास दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. पण कोरोनामुळे राज्याचे अर्थिक गणित कोलमडल्यामुळे ते शक्य झाले नाही. पण सध्या राज्याच्या अर्थिक स्थितीत सुधारणा होत असून राज्यशासनाकडून लवकरच प्रोत्साहनपर अनुदानासह दोन लाखांवरील कर्जमाफी दिली जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
हसन मुश्रीफ उपपंतप्रधान होतील
आमदार पी.एन.पाटील म्हणाले, बँकेच्या सध्या केंद्र कार्यालय असलेल्या इमारतीचे भूमीपूजन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण अर्थमंत्री असताना केले होते. त्यानंतर ते उपपंतप्रधान झाले. त्याच पद्धतीने सध्या ई-लॉबी इमारतीचे भूमीपूजन पेलेले सध्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ भविष्यात उपपंतप्रधान होतील, असा आशावाद पाटील यांनी व्यक्त केला. त्याबद्दल मुश्रीफ यांनी त्यांचे आभार मानले.