प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा बँकेकडे खातेदार असलेल्या सर्वच पगारदार-नोकरदारांना बँकेने 30 लाखाची विमा सुरक्षा योजना लागू केली आहे. न्यू इंडिया ऍशूरन्स कंपनीच्या विभागीय कार्यालय क्रमांक दोनच्या सहयोगातून ही सुविधा दिली आहे. अवघ्या तीनशे रुपयांच्या हप्ता द्यावा लागणार आहे. योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटीचा 60 लाख रुपयांचा धनादेश बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विमा कंपनीकडे देण्यात आला.
जिल्हा बँकेकडे बचत खाती असलेल्या विविध नोकरदार आणि पगारदार संघटनांनी बँकेकडे विमा सुरक्षा योजनेची मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करीत बँकेने 17 हजार पगारदारांच्या विमा सुरक्षेपोटी 60 लाख रुपयांचा धनादेश कंपनीकडे दिला. उर्वरित 13 हजार पगारदारांच्या विम्यापोटीची रक्कम दुसऱया हप्त्यात 15 मार्चपर्यंत दिली जाणार आहे.
…तर एक कोटी रुपयांची विमा सुरक्षा!- अध्यक्ष हसन मुश्रीफ
धकाधकीच्या जीवनात अशी विमासुरक्षा आवश्यकच आहे. सर्वच पगारदार खातेदारांनीही लाभ घ्यावा. 50 हजारांपेक्षा अधिक पगारदाराची खाती बँकेकडे झाल्यास त्यांना एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण देणार आहे. तसेच त्यांच्या हप्त्याचा निम्मा हिस्सा बँक भरेल, असे मुश्रीफ यांनी जाहीर केले.
यावेळी संचालक पी. जी. शिंदे, आमदार राजेश पाटील, अशोक चराटी, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सर्जेराव पाटील-पेरिडकर, भैय्या माने, अनिल पाटील, माजी खासदार निवेदिता माने, विलासराव गाताडे, असिफ फरास, आर. के. पोवार उदयानी साळुखे, न्यू इंडिया ऍशूरन्सचे डीजीएम रुद्राशिष रॉय, वरिष्ठ व्यवस्थापक जी. भुवनेश्वरी, कर्मचारी युनियने प्रतिनिधी भगवान पाटील, दिलीप लोखंडे, रणजित पाटील व सचिव संघटनेचे संभाजीराव चाबूक आदी उपस्थित होते.
अशी आहे योजना
-अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व 30 लाख
-एक अवयव निकामी अगर 50 टक्के अपंगत्व 15 लाख
-विमा धारकाच्या दोन अपत्यांना शैक्षणिक मदत 50 हजार