शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतला निर्णय
प्रतिनिधी / राधानगरी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतला आहे. ग्रामीण भागात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत असल्यामुळे आम्ही आमच्या ताकतीने ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राधानगरी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अरुणराव जाधव यांनी दिली असून राधानगरी येथे संपन्न झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले, राधानगरी तालुक्यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट झाली आहेत. सहकार क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयार झाले आहेत. त्यांच्या मागणीनुसारच जिल्हा बँकेची निवडणूक लढणार आहे. तालुक्यात प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन उमेदवार ठरवणार आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मा.सरपंच अशोक फराकटे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून शिवसेना पक्षामार्फत निवडणूक लढविण्याची आमची तयारी सुरू झाली आहे. शिवसेनेच्या वतीने राधानगरी तालुक्यात चांगल्या प्रकारे काम सुरु असून पक्षाची संघाटनात्मक बांधणी देखील चांगली झालेली आहे. प्रत्येक गावातील सर्वसामान्य शेतकरी हा आर्थिक स्त्रोत म्हणून विकास सोसायट्यांवर अवलंबून आहे. शेतकरी हिताच्या दृष्टीने जिल्हा बँकेत शिवेसेनेचा प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. यासाठी शिवसेनेमार्फत जिल्हा बँक निवडणूक लढविण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
यावेळी बैठकीस सुभाष चौगले बापू-पंडेवाडीकर, जेष्ठ नेते शावराव भावके, बाजार समिती संचालक विश्वनाथ पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम पाटील, भिकाजी हळदकर, केमीस्ट असोसिएशनचे संचालक विजय बलुगडे, माजी सरपंच अशोक वारके, सुभाष पाटील-मालवेकर, सुभाष पाटील-पुंगावकर, अरविंद पाटील, विलास पाटील, राजेंद्र चौगले, अंकुश कवडे , ए.बी.पाटील राजेंद्र मगदूम, विश्वास राऊत, दीपक शेट्टी, डी.पी.पाटील, संभाजी पाटील, रवींद्र पाटील, राजू वाडेकर यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.
Previous Articleलोणंदमध्ये 1.86 लाखांचा गुटखा जप्त
Next Article नगरसेवक अपात्रता मंगळवारी सुनावणी









