समाजकल्याण अधिकाऱ्यांसह महिला, बालकल्याणमधील अधीक्षक कोरोना बाधित, जिल्हापरिषदेत खळबळ
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा परिषदेमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून मंगळवारी दोन अधिकाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. समाजकल्याण अधिकारी आणि महिला बालकल्याण विभागातील अधिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हापरिषदेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभरात जिल्हापरिषदेतील आठ जणांना कोरोनांचा लागण झाली आहे. जिल्हा परिषदेत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी जिल्हापरिषदेचे कामकाज 50 टक्के कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. स्वच्छतेसह सर्व आवश्यक काळजी घेतली जात असतानाही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होताना दिसत आहे. यापूर्वी ग्रामसडक विभागमधील महिला कर्मचारी, उपाध्यक्ष, त्यांचे स्वीय सहायक, चालक, ग्रामिण पाणीपुरवठा विभागातील कक्ष अधिकारी आणि ग्रामपंचायत विभागमधील ग्रामसेवक अशा एकूण सहा जणांना कोरोना संसर्ग झाला होता. आता ही संख्या आठवर पोहोचली आहे.
समाज कल्याण अधिकाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी ते गडहिंग्लज येथील मूकबधिर आणि मतिमंद शाळा तपासासाठी गेल्याचे समजते . या ठिकाणी तीनही शाळांच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.