कोरोनामुळे बंद्ना ठेवलेली मैदाने सरावासाठी खुली करण्याची केली मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
वेळ दुपारी बाराची. शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या माध्यमातून खेलो इंडियाअंतर्गंत विविध खेळांच्या स्पर्धा गाजविलेले खेळाडू खेळाच्या किटमध्येच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले होते. त्यांनी कुणाला काही कळायच्या आतच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच चक्क आपापल्या खेळाच्या सरावाला सुरुवात केली. प्रशिक्षकही खेळाडूंना टिप्स देऊ लागले. प्रवेशद्वारावरुन ये-जा करणारे नागरिक हा सराव पाहुण आश्चर्य चकितच झाले. या अनोख्या सरावामागून खेळाडूंना कोरोनामुळे गेली 7 महिने बंद ठेवलेली क्रीडांगणे कधी सुरु करणार एवढेच सांगायचे होते. अर्धातासांच्या सरावानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली. तसेच त्यांना केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 15 ऑक्टोबरपासून खेळांच्या ऍपॅडमी व मैदाने सरावासाठी सुरु करा, या मागणीचे निवेदनही दिले.
यावेळी जिल्हाधिकारी व समितीचे पदाधिकारी यांच्यात सरावाच्या मुद्यावरुन चर्चा देखील झाली. मैदाने लवकरात लवकर सुरु करा, अन्यथा खेळातील खेळाडूंचा दर्जा घसरेल. शिवाय सरावात जिकता खंड पडणार तितका तो भरुन काढणे त्यांना अशक्य होईल, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. मैदाने सुरु करण्याची मागणी घेऊन खेळाडूंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेला सराव पाहून जिल्हाधिकारी देसाई हे देखील काही काळ विचारात पडले होते. राज्य सरकारकडून निर्देश आल्यानंतर मात्र तातडीने खेळांच्या ऍपॅडमींसह मैदाने सरावासाठी सुरु करण्यास परवागनी मिळेल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
यावेळी समितीचे संभाजीराव जगदाळे, अशोक पोवार, रमेश मोरे, राजेश वरक, बाबासाहेब देवकर, ईश्वरा गायकवाड, निवोद डुणुंग, विक्रांत पाटील, चंद्रकांत पाटील, दीपक घोडके, लहू शिंदे, महेश लोखंडे, कादर मलबारी यांच्यासह स्केटींगचे महेश कदम, सुहास कारेकर, क्रिकेटचे शिवाजी कामते, जिम्नॅस्टीकचे संजय तोरस्कर, जलतरणचे निळकंठ आखाडे, हॉकीचे योगेश देशपांडे, ज्युदोचे शरद पोवार, कुस्तीचे रामा धर्मोदी व बॉक्सिंगचे मंगेश कराळे आदी उपस्थित होते.









