प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हयामध्ये वेगवेगळया तालुक्यामध्ये विविध दिवसांकरिता जनता कर्फ्यू न लावता जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख सर्व खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी व प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढावा व जिल्हयासाठी एकच जनता कर्फ्यू करावा अशी मागणी करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकाव्दारे केली आहे.
या पत्रकात त्यांनी पुढे दिलेली माहिती अशी की, कोरोनाचा वाढता कहर एकत्रीत येऊन परतवून लावण्यासाठी तसेच स्वयंशिस्तीचे नागरिकांनी स्वतः पालन करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणा यांचेमार्फत समन्वय साधण्यासाठी कोरोना योध्दा स्वयंसेवक योजना राबवाव्यात अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली आहे.
जिल्हयामध्ये सध्या कोरोनाचे 30,670 रुग्ण आहेत. त्यामधील बरे झालेले रुग्ण 19,325 तर 943 जणांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीत देखील कोल्हापूर जिल्हयातील नागरिकांनी संयमाने प्रशासनाला साथ दिली आहे. भविष्यकाळातही अशीच साथ नक्की नागरिकांच्याकडून मिळेल पण यासाठी प्रत्येक जण आपापल्या तालुक्यापुरते जनता कर्फ्यू न लावता यामध्ये सर्वपक्ष, विविध संघटना व घटकांनी एकत्र बसून जिल्हयासाठी म्हणून योग्य तो एक निर्णय घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन कोरोनाचा कहर आटोक्यात येण्याचा प्रयत्न होईल असे वाटते असे आवाहन त्यांनी केले आहे.