प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय असतानाच गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. शनिवारी,17 नवे रुग्ण आढळले तर शुक्रवारी 19 रुग्ण आढळले होते. दोन दिवसांत 36 रुग्णांची भर पडल्याने जिह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.
रात्री 10 रुग्णांची भर
दरम्यान, शुक्रवारी घेतलेल्या स्वॅब पैकी काही स्वॅबचे अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. यामध्ये आणखी 6 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. इचलकरंजी कुडचे मळा येथील चार यामध्ये 18, 19 व 26 वर्षाचे तरूण, 43, 55 व 70 वर्षीय महिलांचा समावेश आहे. भुदरगड तालुका पिंपळगाव येथील सहा वर्षीय बालक, हातकणंगले तालुक्यातील संगम नगर येथील 27 वर्षीय महिला, तर करवीर तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथील 21 वर्षीय तरूणाला कोरोनाची बाधा झाली आहे.
इचलकरंजीत बाधितांची संख्या 28
इचलकरंजीः शहरातील कुडचे मळा येथील कोरोनाबाधीत यंत्रमाग कामगाराच्या मालकाच्या कुटुंबासह 8 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात यंत्रमाग कारखानदाराच्या कुटुंबातील 4 सदस्य, काडापुरे तळ येथील दोघे तर बोरगाव (ता. चिकोडी) येथील दोघांचा समावेश आहे. शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या कुडचे मळा येथील एका यंत्रमाग कामगाराला मंगळवारी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सहकारी कामगार, कांडीवाली, मुलगा व नात यांनाही कोरोनाची लागण झाली होती. शनिवारी रात्री उशिरा यात आणखी 8 जणांची भर पडली असून यात त्या कामगाराच्या मालकाच्या कुटुंबातील चार सदस्य, काडापुरे तळ येथील दोघे तर बोरगाव येथील दाम्पत्याचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 28 वर तर यापैकी 23 जणांवर उपचार सुरू आहेत.
संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दरम्यान, कुडचे मळा परिसरातील यंत्रमाग कारखानदार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक माहिती देत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱयांना मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिले आहेत.
पेठवडगावमधील नातेवाईकांचे स्वॅब तपासणीला पाठवले
इचलकरंजी येथील कुडचे मळा येथील कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या त्यांचे पेठ वडगाव येथील इंदिरा कॉलनी व भजनी गल्ली असे तीन नातेवाईकांना स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांना हातकणंगले येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. हे नातेवाईक वर्ष श्राद्ध कार्यक्रमासाठी इचलकरंजी येथे गेले होते. नातेवाईकांच्या कोरोना चाचणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








