प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात गळीत हंगामात ऊसतोडणीसाठी आलेल्या परराज्य, परजिल्हय़ातील 13 हजार ऊसतोडणी कामगार होते. ते कोरोना प्रतिबंधातर्गंत लॉकडाऊन काळात अडकून पडले होते. त्यापैकी 12 हजार 866 तोडणी कामगारांना त्यांना गावी पाठवण्यात आले आहे. उर्वरित 2 हजार 423 कामगार परजिल्हय़ांतील असून त्यांची व्यवस्था निवारागृहांत केल्याची माहिती शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हय़ातील काही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम रखडला होता, त्यातच कोरोनाची साथ उद्भवली. त्यामुळे देशभर लॉकडाऊन पुकारण्यात आला. हंगामात ऊसतोडणीसाठी आलेल्या टोळय़ा जिल्हय़ात अडकून पडल्या होत्या. त्यांना त्यांच्या निवासस्थानी सेवा दिल्या होत्या. काहींना निवारागृहांत ठेवले आहे. 10 साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात राज्यातील, परजिल्हय़ांतील 13 हजार ऊसतोडणी कामगार होते. परराज्यांतील 2 हजार 423 कामगार आहेत. लॉकडाऊनमुळे या 15 हजार 422 कामगारांना 158 ठिकाणी ठेवले होते. गेल्या चार दिवसांत यातील 12 हजार 866 ऊस तोडणी कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहे. हे सर्व राज्यातील आहेत. अद्यापी 26 ठिकाणी 133 ऊस तोडणी कामगार आहेत. त्यांना काही अडचणींमुळे पाठवण्यात आलेले नाही. परराज्यातील अडीच हजार तोडणी कामगार निवारागृहांत आहेत. मुळचे सांगलीचे असलेले पण सध्या कर्नाटकात असलेले 20 तोडणी कामगार आहेत. पण त्यांनाही निवारा गृहात ठेवल्याची माहिती प्रशासनाने दिली.








