पन्हाळ्यातील राजकीय वर्तुळात खळबळ:जनसुराज्यमधील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर
प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा नगरपरिषदेतील जनसुराज्यशक्तीपक्षाच्या माजी उपनगराध्यक्षा व विद्यामान नगरसेविका यास्मिन मुजावर यांच्यासह माजी नगरसवेक अख्तर मुल्ला, उमरफारुख मुजावर यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासास्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पन्हाळ्यात जनसुराज्यशक्ती पक्षाला धक्का बसला असुन अचानक झालेल्या या घडामोडीमुळे नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पन्हाळा नगरपरिषदेवर सध्या जनसुराज्यशक्ती पक्षाची एकाहाती सत्ता आहे. याठिकाणी नगराध्याक्षा सह १२ नगरसेवक हे या पक्षाचे आहेत तर विरोधी शाहु व पन्हाळा विकास आघाडीकडे पाच जागा आहेत. यास्मिन मुजावर या प्रभाग क्र. आठ मधुन जनसुराज्यच्या तिकीटावर निवडुण आल्या होत्या. त्याच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे जनसुराज्य पक्षाच्या सत्तेला याठिकाणी कोणताही धोका नसला तरी ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर विद्यामान नगरसेवकासह माजी नगरसेवकांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशामुळे ही जनसुराज्यशक्ती पक्षासाठी धोक्याची घंटा आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पन्हाळ्यात जनसुराज्यशक्ती पक्षामध्ये दुफळी पडल्याची चर्चा सुरु होती. त्यात सर्वसाधारण सभा देखील नगरसेवकांनी तहकुब केली होती. त्यामुळे नगराध्यक्षा रुपाली धडेल व जनसुराज्यच्या नगरसेवकांच्यात धुसफुस उघड झाली होती. तर नगराध्यक्ष नगरसेविकांना विचारात न घेताच कारभार करत असल्याची ओरड सत्ताधारी नगरसेविकांच्यातुन होत होती. त्यात जनसुराज्यच्या नगरसेविका यास्मिन मुजावर, माजी नगरसेवक अख्तर मुल्ला, माजी नगरसेवक फारुख मुजावर यांनी शिवसेने प्रवेश केल्याने जनसुराज्यमधील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तिघांना शिवबंधंन बांधले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. याबाबत अख्तर मुल्ला व यास्मिन मुजावर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण शिवसेनेच्या ध्येय धोरणांशी प्ररित होवुन विकासकामांसाठी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची सांगितले. दरम्यान, यास्मिन मुजावर व फारुख मुजावर यांनी दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करुन बेकायदेशीर बांधकाम केल्याने जिल्हाधिकारी यांनी यास्मिन मुजावर यांचे नगरसेवक पद रद्द केले होते. याबाबत मुजावर यांनी राज्यशासनाकडे अपिल केली होती. आपले नगरसेवक पद सुरक्षित रहावे व होणारी कार्यवाही टाळावी यासाठीच या तिघांनी शिवसेने प्रवेश केल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातुन व्यक्त होत आहे.









