चित्रप्रदर्शन भरत नसल्याने कलाकृती धुळ खात : अर्थिक अडचणीत भर
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
कोरोना कालावधीमध्येही संवेदनशील मनाच्या चित्रकारांनी कुंचल्याच्या सहाय्याने मनातील भावभावना कागदावर रेखाटत उत्कृष्ट कलाकृती साकारल्या. कोरोनानंतर तरी चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या कलाकृतींना मागणी वाढेल, अशी आशा चित्रकारांना होती. परंतू गेल्या वर्षभरापासून कोल्हापुरात अद्याप एकही चित्रप्रदर्शन भरले नाही. त्यामुळे कोल्हापुरातील जवळपास १५० चित्रकारांच्या उत्कृष्ट कलाकृती धुळ खात पडल्या आहेत. परिणामी चित्रकारांचे आर्थिक चक्रच थांबले आहे.
कोरोनाच्या कालावधीत चित्रकारांना शांत मनाने आपल्या डोक्यातील कल्पना कागदावर उतरवण्याची संधी मिळाली. कोणताही आर्थिक स्त्रोत नसताना हात उसणे करीत चित्रकारांनी दर्जेदार कलाकृती साकारल्या. चित्रप्रदर्शनाला दिवाळीमध्ये सुरूवात होईल अशी आशा होती. परंतू ऑनलाईन चित्रप्रदर्शन आणि स्पर्धा सुरू झाल्याने चित्रकारांच्या नशीबी नाराजीच आली आहे. कारण प्रत्यक्ष चित्र पाहिल्यानंतर जी अनुभुती येते ती ऑनलाईन चित्र पाहिल्यानंतर येत नाही. ऑनलाईन प्रदर्शनात चित्रांचे बुकींग केले जाते पण विक्रीच होत नसल्याचे समोर आले आहे. चित्रप्रदर्शनात विक्री झालेल्या चित्रांच्या माध्यमातून चित्रकाराला वर्षातून किमान दीड दोन लाख रूपये मिळायचे. यातून तो आपला चरितार्थ चालवतो. सध्या मात्र आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. चित्र तयार करणे, चित्राची प्रेम तयार करणे, चित्रप्रदर्शन मांडणे यामध्ये हजारो रूपये खर्च करावे लागतात. उधारीवर साहित्य घेवून काढलेल्या चित्रांची विक्री न झाल्याने, चित्रकारांच्या भावना दुखावत आहेत.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनसह देश-विदेशात चित्रप्रदर्शन भरवली जातात. स्थानिक पातळीवरील चित्रप्रदर्शनात चित्रकारांच्या चित्रांची फारशी विक्री होत नसते. त्यामुळे चित्रकारांना आर्थिक झळ सोसावी लागते. परंतू याच कलाकृती कोल्हापुर आर्ट फौंडेशन कला महोत्सवासह देश-विदेशातील चित्रप्रदर्शनात मांडल्या तर त्यांचा भाव वधारतो. अशा प्रकारची चित्र प्रदर्शने, स्पर्धा, महोत्सव म्हणजे चित्रकारांसाठी पर्वणी असायची. त्याचबरोबर पुणे-मुंबईसह देश-विदेशातील प्रदर्शनात उत्कृष्ट कलाकृतीला चांगली किंमत मिळते. परंतू कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात अद्याप चित्रप्रदर्शन भरलेले नाही. कोल्हापुरसह , राज्यभरात चित्रप्रदर्शन कधी भरणार याकडेच चित्रकारांच्या नजरा लागलेल्या आहेत.
चित्रकारांनी ऑनलाईन मार्केटींगकडे वळावे
कोरोनासारखे नवीन संकटातही न डगमता चित्रकारांनी आपली चित्रकला जपली. शेकडो कलाकृती तयार केल्या, परंतू चित्रप्रदर्शन भरत नसल्याने चित्रकारां
ना आर्थिक झळ पोहचत आहे. त्यामुळे चित्रकारांनी ऑनलाईन मार्केटींगमधील बारकावे समजून घेतले पाहिजेत. जेणेकरून आपली कलाकृती जागतिक पातळीवरील बाजारात पोहचू शकेल.
विजय टिपुगडे (ज्येष्ठ चित्रकार)