पुलाची शिरोली / वार्ताहर
महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी,कोल्हापूर व पोलीस प्रशासन यांच्या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या घोडागाडी शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी मंगळवारी आयोजकासह आठ जनांच्यावर कारवाई केली. यावेळी अनेकजण पळून जाण्यात यशस्वी झाले.त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
सचिन राजू कांबळे. पेठवडगाव, इब्राहिम बालेचांद खतिब. हेरले ता.हातकणंगले, हरिश्चंद्र भगवान बंडगर रा. शामरावनगर सांगली, किरण रघुनाथ लोंढे रा. पोखर्णी तालुका वाळवा, अनिकेत बाळासो चौगुले रा, धामोड ता.राधानगरी , सलीम बाळासो बारगिर रा. मौजे वडगाव, प्रमोद आप्पासो रजपूत, कुपवाड, सचिन मनोहर चौगुले, रा. नागाव या आठ जणांच्यावर वेगवेगळ्या कलमाद्वारे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पेठवडगाव येथील सचिन राजू कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी सकाळी साडेसात वाजता टोप ता. हातकणंगले गावाच्या हद्दीत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळावर घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पथकाद्वारे छापा टाकला असता चार घोडे. तीन घोडागाडी, चार टेंपो व आठ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र covid-19 अधिनियम व भारतीय साथ रोगनियंत्रण आदी कलमाद्वारे घोडागाडी शर्यतीचे आयोजक घोडा मालक, घोडा वाहतूक करणारे वाहन मालक यांचे विरुद्ध शिरोली पोलीस एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद सचिन युवराज पाटील पोलिस कॉन्स्टेबल यांनी दाखल केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. बी .पाटील हे करत आहे.









