प्रतिनिधी / घुणकी
घुणकी ता. हातकणंगले येथील प्रशासकिय मान्यता मिळालेल्या तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत उभारणीस लवकरच सुरवात करण्यात येणार असून यासाठी शासनाकडून ९० लाख रुपये पहिला हप्ता मिळाला असल्याची माहिती आ.राजूबाबा आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय महामार्गावर कराड ते कोल्हापूरच्या दरम्ययान एकही मोठे रुग्णालय नसल्याने अपघात झाल्यानंतर जखमींवर उपचार होण्यात बराच कालावधी जात होता, उपचाराभावी अनेक जखमींचा वाटेतच मृत्यू होत होता याबरोबरच किणी-घुणकी-वाठार पंचक्रोशीतील नागरिकांना परिसरात सुसज्ज अशा शासकीय रुग्णालयाची गरज होती यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे,राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचेकडे आ.राजूबाबा आवळे यांनी पाठपुरावा केल्याने, नुकतीच या ३०खाटांच्या रुग्णालयास प्रशासकीय मंजुरी मिळून सुमारे रुग्णालयाच्या ३३ हजार स्क्वेअर फूट इमारतीसाठी १४ कोटी २१ लाख रुपयांचा निधीही पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आला, यासाठीची तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर बांधकामासाठीचा पहिला हप्ता म्हणून ९०लाख रुपये मिळाला असल्याची माहिती आ.आवळे यांनी देऊन इमारतीचे रेखांकन सुरू असून दोन महिन्यात प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार असल्याचे सांगितले.
गेल्याच महिन्यात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर ,आ.राजूबाबा आवळे यांनी हे रुग्णालय उभारण्यात येणाऱ्या महामार्गालगत असणाऱ्या जागेची अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती, सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून मंजुरीसाठी ठेवण्याचे आदेश त्यानी अधिकाऱ्यांना दिले होते, रुग्णालयांची ही अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांसह महामार्गावरील जखमींना हे रुग्णालय वरदान ठरणार असल्याचे सांगितले.









